छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अन्य कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्र्यांची कार्यालये नसतानाही पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मागणीवरून जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याने राजकीय पटलावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेेत. दरम्यान या कार्यालयात राजकीय घडामोडी दिसून आल्यास ते दालन बंद केले जाईल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले. जिल्हा वार्षिक आराखड्यातील कामासंबंधी कामकाजासाठी कार्यालय उपलब्ध करून देण्याचा नियोजन विभागाचा शासन निर्णय असल्याचा दावा जिल्हाधिकारी यांनी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांचे कार्यालय थाटल्यास ती इमारत पालकमंत्री कार्यालय अशी ओळखली जाईल, अशी टीका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. कोणत्या तरतुदीच्या आधारे असे कार्यालय थाटण्यास परवानगी दिली गेली, याविषयी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, असे कार्यालय फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे असे नाही. सोलापूरमध्येही असे कार्यालय आहे. अन्यही काही जिल्ह्यात पालकमंत्र्यांसाठी स्वतंत्र कार्यालय आहे. जिल्हा नियोजन समितीची काही कामे येथून होतील. या कार्यालयातून प्रशासकीय स्वरुपाचीच कामे होतील. जर राजकीय उपक्रम झाले तर ते कार्यालय बंदही केले जाईल. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नवे दालन थाटण्याच्या नवीन प्रघातामुळे मंत्री शिरसाट यांच्यावर टीका होऊ लागली आहे.