हिंगोली : तालुक्यातील सिरसम बु.ते डिग्रसवाणी रस्त्यावरील एका वळणावर दुचाकीला अपघात होऊन डिग्रसवाणी येथील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ११ जानेवारीला समोर आली होती. परंतु, हा अपघात नसून अपघाताचा बनाव करत मुलानेच आई-वडिलांसह सख्ख्या भावाचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याची माहिती पोलिसांकडून आयोजित पत्रकार बैठकीत देण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी सांगितले की, डिग्रसवाणी गावाजवळ एका नाल्यात अपघातग्रस्त दुचाकीसह तिघांचेही मृतदेह ११ जानेवारीला आढळून आले होते. त्यामध्ये कुंडलिक श्रीपती जाधव (वय ७०), कलाबाई कुंडलिक जाधव (वय ६०) व त्यांचा मुलगा आकाश कुंडलिक जाधव (वय २७) हे घटनास्थळी मृतावस्थेत आढळून आले होते. त्याची माहिती मिळताच बासंबा पोलिसांनी घटनास्थळी जावून तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले होते. प्रारंभी तिघांचाही मृत्यू दुचाकी अपघातात झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा अपघात नसून अपघाताचा बनाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी घटनेचा सखोल तपास करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.

हेही वाचा : धाराशिव : माकणी परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के

पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, विलास चवळी, पोलीस अंमलदार प्रवीण राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरविली. यावेळी मृत कुंडलिक जाधव यांचा दुसरा मुलगा महेंद्र जाधव याच्याकडे संशयाची सुई फिरत होती. विशेष म्हणजे त्यांच्या घरातील एका भिंतीवर व दुचाकीवरही रक्ताचे डाग दिसून आले होते. त्यावरून पोलिसांनी महेंद्र यास चौकशीसाठी ताब्यात घेत खाक्या दाखविला असता त्याने वडील, आई तसेच भाऊ यांचा खून केल्याची कबुली दिली. आरोपीला मागितल्याप्रमाणे पैसे मिळत नसल्यामुळे घरात वाद होता. यापूर्वी आरोपीला वडिलांनी व भावाने धमकवण्याचा प्रयत्नही केला होता.

हेही वाचा : नांदेड : बेपत्ता बालिकेचा मृतदेह १८ तासांनंतर आढळला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताचा केला बनाव

मृत कुंडलिक जाधव यांची तब्येत बिघडल्याने आकाश जाधव व कलाबाई जाधव यांनी त्यांना दुचाकीवरून दवाखान्यात नेले. मात्र, दवाखान्यात नेत असताना त्यांचा अपघात होऊन तिघांचाही मृत्यू झाला, अशा प्रकारचा बनाव आरोपीने रचला होता. वास्तविक आरोपीने क्रमाक्रमाने वेळेची संधी साधून एकएकाला मारून घटनास्थळी नेऊन टाकले होते, अशी कबुली आरोपीने पोलीस तपासात दिल्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी सांगितले.