परभणी : राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पाथरी उपविभागांतर्गत ग्रामीण शाखेतील वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा नारायणराव पितळे यास नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याकरीता एका शेतकर्‍यांकडून तीन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने ताब्यात घेतले. मंगळवारी (दि.११) दुपारनंतर पथकाने ही कारवाई केली. पितळे याच्या घराची झडती घेतली असता या झडतीतून ६ लाख ९५ हजार ११० रुपये पथकाने जप्त केले. दरम्यान, या आरोपी विरोधात पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू होती.

झरी कॅनॉलजवळील असलेल्या शेतातील विद्युत मोटारीकरीता डिपीवर नवीन ट्रान्सफार्मर बसवून देण्याकरीता एका शेतकर्‍याने वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा पितळे यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा पितळे याने तीन हजार रुपये द्यावे लागतील, असे सुनावले. त्यामुळे संतप्त शेतकर्‍याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या परभणी कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली, त्याआधारे या खात्याच्या पथकाने पंचासमक्ष त्या संदर्भात खात्री केली आणि मंगळवारी सिमुरगव्हाण फाटा येथील मोहिनी टी हाऊसवर सापळा रचून पितळे यास तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या पथकाने पितळे याची अंग झडती घेतली तेव्हा रोख आठ हजार रुपये आढळून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पथकाने पितळे याचा मोबाईलही जप्त केला आहे. या विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संजय तुंगार, पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक बसवेश्‍वर जक्कीकोरे, पोलिस निरीक्षक अलताफ मुलानी, निलपत्रेवार, शेख जिब्राईल, कल्याण नागरगोजे, नामदेव आदमे, जे.जे. कदम व नरवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.