छत्रपती संभाजीनगर : तिसऱ्या भाषेचा अट्टहास करत हिंदी भाषा शिक्षण लागू करण्यावरून वाद सुरू असताना, ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांची ‘नीट’ आणि ‘आयआयटी’ची तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गांतील अध्यापकांमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशातील हिंदी भाषीकांचे प्राबल्य वाढलेले राज्यभर दिसून येत आहे. हा प्रभाव एवढा आहे, की लातूरसारख्या यशस्वी शैक्षणिक प्रारूपाची राज्यभर चर्चा असणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयात आता १६ प्राध्यापक मराठी, तर ३४ प्राध्यापक परप्रांतीय आहेत. त्यातही बिहारचा वाटा अधिकच असल्याचे दिसून येते. शिकवणी वर्गातून गणितासाठी दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील शिक्षकांकडे शिकण्याचा विद्यार्थ्यांचा कल होता. आता विषयानुरूप शिकवण्याची पद्धत मोडीत निघाल्याने ‘नीट’ आणि ‘जेईई’च्या अध्यापन प्रक्रियेतील मराठी टक्का झपाट्याने घसरलेला आहे. करोनानंतर शिकवणी वर्गाच्या प्रारूपात मोठे बदल झाले. शिक्षकांच्या अध्यापनकौशल्यामुळे शिकवणी वर्गांना होणारी गर्दी ओसरली. शिकवणी वर्गाच्या आक्रमक जाहिरात प्रारूपामुळे त्याचे राज्यभर ‘कोटा’करण झालेले आहे. वैद्याकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेची तयारी करून घेणाऱ्यांमध्ये बिहारी तरुणांची संख्या मोठी आहे. लातूरमध्ये पाटणा येथून आलेले अध्यापक म्हणाले, ‘माझे रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. मुंबईमध्येही मी काही दिवस काम केले. करोनानंतर अध्यापनाच्या क्षेत्रात बदल झाल्याने महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली. लातूरच्या महाविद्यालयात ९८ टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी येतो. त्याला शिकवणी वर्गात टिकवून ठेवण्यासाठी काही क्लृप्त्या कराव्या लागत नाहीत. शिकवण्यातला आनंद मिळत आहे. आम्ही शिकवलेली अधिकाधिक मुले वैद्याकीय अभ्यासक्रम शिकण्यास पात्र ठरत आहेत.’ उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या ‘सिन्हा’, ‘गुप्ता’, ‘तिवारी’ अशा आडनावाच्या अध्यापकांना विद्यार्थीही सकारात्मक प्रतिसाद देत असल्याने या प्राध्यापकांचे सरासरी वार्षिक वेतनही किमान ४० लाख रुपये आहे.

‘नीट’, ‘जेईई’ या अभ्यासक्रमाच्या अध्यापनातील बिहारी प्रभाव किती याविषयी बोलताना, लातूरमध्ये शिकवणी वर्ग चालविणारे उमाकांत होनराव म्हणाले, ‘हे तंत्र काठिण्य पातळीचे आहे. त्यामुळे परराज्यांतील व्यक्तींनी शिकवायला यावे, असा आग्रह सर्वत्र आहे. आता आमचे बिहारच्या या अध्यापकांशी एवढे संबंध आहेत, की त्यांच्या घरातील बारशाचेही निमंत्रण आम्हाला दिले जाते. आणि आम्हीही या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत वर्षात दोन-दोनदा जाऊन येतो.’ परराज्यांतील या प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी काही महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेतल्या जातात. सर्वाधिक गुण घेणाऱ्या प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. राज्यभर एकमेकांच्या संदर्भाने, तसेच मनुष्यबळ पुरवठादार सल्लागारांच्या सहाय्याने परराज्यांतील अध्यापकांचा प्रभाव राज्यभर दिसून येत आहे.

विज्ञान आणि गणित हे दोन्ही विषय शिकताना भाषेची तशी अडचण येत नाही, असे विद्यार्थीही सांगतात. भाषिक कौशल्यापेक्षाही विषयज्ञान समजावून सांगण्याचे कौशल्य चांगले असावे, असा भर असतो. त्याचा परिणामही दर्जा वाढविण्यासाठी होत असल्याने शिकवणी वर्गातून हिंदी भाषिकांचे प्रमाण जवळपास ७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. परप्रांतीय ७० टक्के आणि ३० टक्के मराठी असे सूूत्र या क्षेत्रात करोनानंतर दिसून येत आहे.

वेतन किती?

राज्यातील शिकवणी वर्गात परप्रांतीय अध्यापकांचे वार्षिक वेतन किमान ३० ते कमाल ४५-५० लाख रुपयांपर्यंत आहे.

शिकवणी वर्गातील गुणवत्तावाढीच्या वेगवेगळ्या प्रयत्नांमध्ये परप्रांतीयांचे वाढते प्राबल्य गेल्या काही वर्षांत कमालीचे वाढले आहे.

केवळ लातूरच नव्हे, तर नांदेड, कोल्हापूर, पुणे, नाशिकमधील शिकवणी वर्गाच्या व्यावसायिक संस्थांमध्ये हिंदी भाषकांचा प्रभाव वाढलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नीट’ परीक्षेच्या काठिण्य पातळीवर काम करणारी मंडळी महाराष्ट्रातही आहेत. पण देशाच्या पातळीवरील या परीक्षेसाठी आवश्यक असणारी तयारी करून घेणारी यंत्रणा शाहू महाविद्यालयात गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. त्याला एक प्रकारची शिस्त आहे. त्यामुळेच आतापर्यंत एका महाविद्यालयातून साडेसात हजार वैद्याकीय प्रवेश होऊ शकले. परप्रांतीय अध्यापकांची स्वतंत्र परीक्षा घेऊन त्यांची नियुक्ती केली जाते.- डॉ. महादेव गव्हाणे, प्राचार्य, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर