छत्रपती संभाजीनगर : नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीच्या जलाशयात सोमवारी मोठी वाढ झाली. जायकवाडी धरणात आता ५३.७० टक्के पाणीसाठा झाला आहे. येत्या काही दिवसांत पाण्याचा ओघ वाढत राहील, असे सांगण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे दिवाळी दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरण भरते.
मात्र, या वर्षी जुलैमध्ये धरणसाठा ५० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. जायकवाडी धरणात आता ११६५ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. जायकवाडीच्या उध्वधरणातून दुपारी तीन वाजता ३५ हजार ५५८ प्रति सेकंद पाणी येत होते. त्यामुळे जायकवाडीची पाणीपातळी वाढली. गेल्या वर्षीही जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने सिंचनासाठी आवर्तने मिळाली होती. या वर्षी जलसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. नांदूर मधमेश्वर येथे ४३ हजार ८८२ वेगाने पाणी येत आहे. अन्य १४ धरणांतून प्रवाह येत आहे.