सुहास सरदेशमुख, लोकसत्ता 

छत्रपती संभाजीनगर : व्यासपीठावरून गर्दीला समोरे जाण्यापूर्वी ‘उत्खनक’ अर्थात एक्सकेव्हेटरमधून पुष्पवृष्टी करण्याचे लोण राज्यात पसरले आहे. क्विंटल फुले, गुलालाची उधळण किंवा उत्खनकावर बांधलेला अजस्त्र हार गळयात घालून घेत आपली राजकीय ताकत दाखविण्याचा नेतेमंडळींचा प्रयास असतो. शिवाय रस्त्यांची उभारणी, तलाव खणणे यासाठीही हे उत्खनक वापरले जातात.

गेल्या काही महिन्यांत उत्खनकाच्या विक्रीत झपाटयाने वाढ झाली आहे. राज्यात ३८,६९९ यंत्रे विकली गेली आहेत. प्रतिमाह ५० ते ६० उत्खनकांची विक्री आता ७५ ते ८० पर्यंत वाढली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५,५२५ उत्खनक आहेत. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात २,२५३ यंत्रे आहेत. अहमदनगर, श्रीरामपूर या भागातही उत्खनकाची संख्या वाढू लागली आहे. मराठवाडयात दुष्काळामुळे विक्रीचा वेग वाढलेला आहे. टायर असलेल्या उत्खनकाची किंमत ३५ लाख रुपये आहे. याचा अर्थ आतापर्यंत या यंत्रामुळे १३,५४४ कोटी ६५ लाखाची उलाढाल झाली आहे. या यंत्राने ग्रामीण भागातील कष्टाच्या कामांची गणिते पूर्णत: बदलली आहेत. राष्ट्रीय महामार्गापासून ते दुष्काळात जलयुक्त शिवापर्यंत आणि शेततळय़ांपासून फळबागांसाठी लागणारे खड्डे खणण्यासाठी या यंत्रांना मोठी मागणी आहे. मराठवाडयातील शेंद्रा-बिडकीन या औद्योगिक पट्टयातील चितेगावमधील दादासाहेब मोटे पाटील यांचे खडी केंद्र आहे. शिवाय ते प्रति एक हजार रुपये तास दराने उत्खनक यंत्रे भाडयाने देतात. त्यांनी सांगितले, की बिडकीन ते छत्रपती संभाजीनगपर्यंत पन्नास किलोमीटर पट्टयात ५० यंत्रे आहेत. प्रत्येक गावात १०-१५ यंत्रे सापडतात. कोणत्याही स्वरूपाचे मातीकाम सर्रासपणे उत्खनकाने केले जाते. कष्टाचे काम करायला बिहार, मध्य प्रदेश येथून मजूर आणावे लागतात. शिवाय जे काम करायला मजूर आठ दिवस लावत, ते काम यंत्राने काही तासांत होते. त्यामुळे ३५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक परवडते, असे मोटे पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> तुळजाभवानी देवीचे मंदिर राहणार २२ तास खुले, पुढील सात दिवस सशुल्क व्हीआयपी दर्शन बंद

उत्खनक विक्रीच्या व्यवसायातील रत्नप्रभा मोटर्सचे मालक व उद्योजक मानसिंग पवार म्हणाले, ‘वेगात काम करणारे हे यंत्र ग्रामीण भागात सध्या लोकप्रिय आहे. बेरोजगारीमुळे तरुणांच्या हाताला काम नाही. शिकलेली पिढी नवे काही करू पाहते आहे. त्यामुळे कौशल्य असलेल्यांना या यंत्राचा लाभ होतो. गैरबँकिंग संस्थेकडून दिलेले कर्जही वर्ष-दोन वर्षांत फेडून अनेक जण पाच-पाच यंत्रांचे मालक बनले आहेत. त्यामुळे ’चालकच बनेल मालक’ नावाची योजना आम्ही राबवतो.’ बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बबन गायकवाड वाहनचालक होते. ते आता आठ यंत्रांचे मालक झाले आहेत. त्यांनी २००७ मध्ये आपल्या तीन मित्रांसह पैसे गोळा करून व खासगी वित्तीय कंपनीकडून १४ टक्के व्याजाने कर्ज घेऊन यंत्र घेतले. कर्ज फेडून हाती आलेली रक्कम साठवून त्यातून त्यांनी आठ यंत्रे घेतली आहेत. चौघांपैकी दोघांनी नंतर व्यवसाय थाटला आहे. दुष्काळ पडला तेव्हा विहिरीची मागणी वाढली. जलयुक्त शिवार, शेततळय़ांची अनेक कामे केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

आता यात नवे तंत्रज्ञान आले आहे. उत्खनकाची सोंड (लाँग रीज – एलआर) अधिक लांब झाली आहे. त्यामुळे विहिरींची कामे अधिक झपाटयाने होत आहेत. गोदाकाठच्या गावांमध्ये १०० फुटांपर्यंतही पाणी लागते. मात्र, धाराशिवसारख्या जिल्ह्यात खूप खोलवर पाण्याचा पाझर लागतो. त्यामुळे विहिरी खणताना जिलेटिनचे स्फोट घडवून आणावे लागतात. त्यामुळे आता विहिरीत उतरून काम करणारे छोटे यंत्रही विकसित करण्यात आले आहे. रोजगार हमीतून होणाऱ्या विहिरीदेखील आता यंत्रानेच होतात, असे या क्षेत्रातील मंडळी सांगतात.

प्रमुख उत्पादक कंपन्या

जेसीबी, ह्युंदाई, पॅनी, टाटा हिताची, कोम्तसु, कोबॅल्को, केस, मिहद्रा, लिगॉग, अ‍ॅक्सीएमजी आदी १५ ते १६ कंपन्या उत्खनक बनवतात. मात्र सत्यप्रतिला ‘झेरॉक्स’ म्हटले जाते, त्याप्रमाणेच अनेकदा या यंत्राचा उल्ले जेसीबी असा केला जातो. यात यंत्रात दोन प्रकार आहेत. टायरवरील यंत्राची नोंद प्रादेशिक परिवहन विभागात केली जाते. त्यानुसार राज्यात ३८ हजार ६९९ उत्खनक आहेत. दुसऱ्या प्रकारचे यंत्र रणगाडयाप्रमाणे लोखंडी रुळांवर उभारलेले असते. त्याला टायर नसल्याचे त्याची ‘वाहन’ म्हणून होत नाही. त्यामुळे त्याची एकत्रित माहिती उपलब्ध नाही.

रोहयोवर परिणाम

* गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती मिळाली आहे. शिवाय राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे यंत्रांना मोठया प्रमाणात मागणी आहे.

* १९७२ च्या दुष्काळात खडी फोडण्याचे काम सरकारने दिले होते. त्यावर अनेक मजूर असायचे. आता खडी फोडण्यासाठीही उत्खनकाचा वापर होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवहार पूर्णत: बदलला आहे.

* रोजगार हमी योजनेवरही याचा परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षांत सार्वजनिक कामावर मजुरांची मोठी संख्या दिसत नाही. वैयक्तिक योजनेत मजूर उपस्थिती दाखवली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सप्टेंबर ते मे हा या यंत्र विक्रीचा हंगाम असतो. विहीर खणण्यासाठी जोडली जाणारी सोंड आता स्थानिक पातळीवर तयार केली जाते. जालना, नगर जिल्ह्यांमध्ये त्याचे स्वतंत्र व्यवसायही सुरू झाले आहेत. ५० फुटांपर्यंतची सोंड तयार करून विहिरीवर हे यंत्र वापरले जाते. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाच या यंत्रामुळे बदलून गेली आहे. – जयेश कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नप्रभा मोटर्स