scorecardresearch

औरंगाबादमधील मतदारसंघांत भाजपचे सूक्ष्म नियोजन; जे. पी. नड्डा यांची सोमवारी सभा, शक्तिस्थळे आणि त्रुटीचा अभ्यास

अनुभवी कार्यकर्त्यांची कमतरता, चांगले वक्ते नसल्याने भाजपकडे असणाऱ्या त्रुटीवर कशी मात करता येईल याचाही अभ्यास केला जात आहे

औरंगाबादमधील मतदारसंघांत भाजपचे सूक्ष्म नियोजन; जे. पी. नड्डा यांची सोमवारी सभा, शक्तिस्थळे आणि त्रुटीचा अभ्यास
(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : १९७१ ते २०१९ या कालावधीमध्ये भाजप-सेना युतीमध्ये तब्बल सात वेळा लोकसभा मतदारसंघात ‘हिंदूत्ववादी’ विचाराचे उमेदवार निवडून आले असल्याने धार्मिक आणि जातीय दुपदरी ध्रुवीकरणाचा केंद्रिबदू असणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सभा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गेल्या ४८ वर्षांत काँग्रेस तीन वेळा, काँग्रेस एस, जनता पार्टी असे निवडणुकीचे निकाल असल्याने विरोधकांच्या ताब्यात असणाऱ्या मतदारसंघात १६ मतदारसंघांपैकी बांधणीची आक्रमक सुरुवात औरंगाबादपासून करता येईल या विचाराने नड्डा यांची पहिली सभा औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या ताब्यात असणारा औरंगाबाद मतदारसंघ लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘छत्रपती संभाजी महाराज नगर’ नावाने अधिकृतपणे ओळखला जावा, ही प्रक्रिया निवडणुकीच्या कोणत्या टप्प्यावर पूर्ण करायची याचा निर्णय भाजपचे नेते ठरवतील. पण तत्पूर्वी भाजपची मतदारसंघातील शक्तिस्थाने व त्रुटी याचा अभ्यासही नुकताच अलीकडेच पूर्ण करण्यात आला आहे. औरंगाबाद मध्य, कन्नड, वैजापूर या विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावरील शक्ती किती अधिक व किती क्षीण यावर अभ्यास करण्यात आला असून केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी हा मतदारसंघ पुन्हा बांधणीला हाती घेतला आहे. पर्यटनस्थळी विविध योजना, बँकिंग क्षेत्रातील कर्ज व लाभार्थीचे गणित घातले जात आहे. याशिवाय अन्य केंद्रीय योजना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विजय मिळविता येऊ शकेल असा भाजप नेत्यांचा अंदाज आहे. अलीकडेच भूपेंद्र यादव यांनीही लोकसभा मतदारसंघाच्या शक्ती व त्रुटीबाबतचा अभ्यास करण्यासाठी दौराही केला होता. अनुभवी कार्यकर्त्यांची कमतरता, चांगले वक्ते नसल्याने भाजपकडे असणाऱ्या त्रुटीवर कशी मात करता येईल याचाही अभ्यास केला जात आहे. लोकसभा मतदारसंघातील नव्या कामांबरोबर काही दिवसात मतदारांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण होते, या भाजपला सशक्त ठरतील अशा बाजूच्या आधारे रणनीती ठरविली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. येत्या काही महिन्यांत महापालिका निवडणुका होणार असल्याने हैदराबाद महापालिकेतील प्रचाराचा मुद्दे औरंगाबादमध्येही आणले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसभा मतदारसंघात सव्वाचार लाख मुस्लीम मतदार आहेत. एकूण मतदारांच्या प्रमाणात हे प्रमाण २१.८ टक्के एवढे आहे. दलित मतदारांची संख्याही १९.२ टक्के असल्याने एमआयएम आणि वंचितच्या युतीला यश आले. २०१९ मध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे खासदार झाले. पाच ते सव्वापाच लाख मराठा मतदार आहेत. मराठा आरक्षण प्रश्नामुळे एकवटलेला मराठा पाहून ओबीसी मतांचे होणारे शेवटच्या टप्प्यातील एकीकरण यामुळे १९९९ ते २०१९ या कालावधीमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना यश मिळत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दलित मतांनी एमआयएमला साथ दिली. त्यामुळे या मतदारसंघात दिला जाणारा संदेश अन्य मतदारसंघातही बांधणीला उपयोगी पडणार असल्याने जे. पी. नड्डा यांची पहिली लोकसभा बांधणीची सभा औरंगाबाद येथे होणार आहे.

औरंगाबाद शहरातील विमान सेवा वाढविण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीस इंडिगो एअरलाइन्सचे प्रवीण गुप्ता, इंडिगोचे मोहित कुमार द्विवेदी यांची उपस्थिती होती. औरंगाबाद हे देशांमध्ये पर्यटन आणि औद्योगिकदृष्टय़ा आघाडीवर असणारे शहर आहे. याशिवाय जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ येथील लेणी हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मोठे आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे अनेक ठिकाणाहून औरंगाबादकडे येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. राज्यांतर्गतही पर्यटक वाढत असून विमान सेवांची संख्या वाढावी म्हणून गोवा- औरंगाबाद- औरंगाबाद, औरंगाबाद- नगर- बेंगलोर, औरंगाबाद- अहमदाबाद- औरंगाबाद, नागपूर- औरंगाबाद- नागपूर, नांदेड- औरंगाबाद, औरंगाबाद- इंदोर- नागपूर, औरंगाबाद- नगर- चेन्नई, गोवा- औरंगाबाद -जयपूर या शहरांना जोडणारी सेवा सुरू करता येईल का, याची चाचपणी करण्यात आली. ही सेवा सुरू करण्यासाठी पुन्हा एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे.

डॉ. कराड यांनी घरगुती गॅसजोडणी तसेच पर्यटनवाढीसाठी केंद्रात पाठपुरावा सुरू ठेवला असून औरंगाबादचे विकास चित्र मांडताना लोकसभा निवडणुकीची बांधीणीही सुरू केली आहे.

डॉ. भागवत कराड यांची हवाई आखणी

विविध विमान कंपन्यांशी चर्चा करून औरंगाबाद येथून विविध शहरांना सेवा सुरू व्हावी यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुन्हा एकदा इंडिगो, स्पाइस जेट, गो फस्ट या विमान कंपन्यांबरोबर चर्चा केली आहे. यापूर्वी आकाश कंपनीबरोबर केलेल्या चर्चेमुळे विमान सेवा काही दिवस सुरू झाली. मा़त्र, ती टिकू शकली नाही. आता पुन्हा सात शहरांना जोडण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ‘जी-२०’ समूह देशांतील अधिकारी औरंगाबाद येथे येण्याबरोबरच डॉ. कराड यांची ही कृती त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 07:25 IST

संबंधित बातम्या