गोऱ्या काश्मिरी शेळीचे आकर्षण वाढतेय
पाच पिले देणारी ‘उस्मानाबादी शेळी’ हे मराठवाडय़ात आकर्षण होते. पण आता गोऱ्या रंगाची शेळी पाळण्याचा नवा प्रकार पाहावयास मिळतो आहे. औरंगाबादमध्ये गावरान शेळय़ांबरोबरच उंचीने कमी असणारी केसांवरून गोरी-गोरीशी वाटणारी, लंबकर्णी बकरी सध्या कुतूहलाचा विषय ठरू लागली आहे. अशी बकरी दिसली तर ती काश्मीरची आहे, असे समजा. ‘जिंग’ या नावाने ओळखली जाणारी ही बकरी रंग-रुप-आकारमानात वेगळी तर आहेच, पण विक्री करताना भावही चांगला मिळत आहे.
औरंगाबादेतील शेळीपालक काश्मिरी पशूच्या प्रेमात पडले आहेत. कश्मिरी जिंगबाबत बोलताना पशुपालक तिचे वर्णन ‘आम के आम और गुठियोंके भी दाम,’ अशा थाटात करताहेत. औरंगाबाद शहर व परिसरातील कन्नड, सिल्लोड, पैठण, वैजापूर आदी भागात सध्या काश्मिरी बकरीचे पालन करण्याकडे कल वाढला आहे. गावरान शेळीपेक्षा कश्मिरी शेळीचे सर्वच अंगाने वेगळेपण आहे. तिची उंची कमी आहे. काश्मीरची असल्यामुळे निसर्गतच अंगावर केस भरपूर आहेत. भुरकट रंग असल्यामुळे तो काहीसा गोरा भासतो. तिला १५ ते २० हजार रुपयांचा भाव मिळतो आहे. गावरान शेळीच्या तुलनेत भाव चार-पाच ते दहा हजारांपर्यंत मिळतो. गावरान शेळी सहा महिन्याला एकदा पिलू देते. तर काश्मिरी बकरीचा भाकड कालावधी कमी आहे. चार महिने दहा दिवसातच ती पुन्हा पिले देऊ शकते, म्हणजे वर्षांतून
तीनवेळा तिच्यापासून पिले मिळू शकतात. औरंगाबादेत दर गुरुवारी छावणी परिसरात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात काश्मिरी बकरी असलेल्या ‘जिंग’ची मागणी करणारे अनेक ग्राहक येतात. या काश्मिरी बकरीमध्ये दोन प्रकार आहेत. एक जिंग आणि दुसरा वल्टम. अन्य ‘बोअर’ नावाचाही एक प्रकार आहे. मात्र फारसा तो आपल्याकडे चालत नाही. जिंग बकरीला केवळ पालनासाठीच पसंती मिळते. तिचे मटन तेवढे काही रुचकर नसल्याचे सांगितले जाते. मात्र, ही बकरी पाळणे आता प्रतिष्ठेचे मानले जात आहे. ‘जिंग’ बकरीची आणखी एक खासियत म्हणजे ती अल्पावधीतच तापमानाशी जुळवून घेते. काश्मिरातील हवामान कमालीचे थंड असते. तर महाराष्ट्र, हैदराबादेतील तापमान काश्मीरच्या तुलनेत काहीसे उष्ण. पण जिंग जुळवून घेते. तुरीचा व गव्हाचा भुसा हे तिचे आवडते खाद्य आहे. पशुपालक मोहंमद जुबेर म्हणाले, अलीकडे या शेळीच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होत आहे.