छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे दोन गटांत झालेल्या किरकोळ वादातून तिघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, गुरुवारी सायंकाळी सातनंतर घडलेल्या या घटनेनंतर खंडाळा गावातील वातावरण तणावपूर्ण आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड हे गावात तळ ठोकून असून, या घटनेला त्यांनी दुजोरा दिला आहे.
गावामध्ये सध्या पूर्ण शांतता आहे. किरकोळ वादातून ही घटना घडल्याचे डॉ. राठोड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. दरम्यान, हल्ला झालेल्या तरुणांना उपचारासाठी वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तेथे एका गटाने साहित्याची मोडतोड करून गोंधळ घातला. गावातही एका दुकानाची जाळपोळ झालेली आहे.
खंडाळा गावात भायगाव येथील तरुण गौरव अनारसे याचे केशकर्तनालयाचे दुकान आहे. या दुकानाजवळच एक हॉटेल असून, तेथेच दोन गटांतील तरुणांमध्ये वाद झाला. या वादातून तिघांवर चाकू हल्ला करण्यात आला. या घटनेत मोईन अखतार शहा (वय २०)याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. तर शेख अबरार शेख, शोएब असिम पठाण व अबुबुकर आरिफ शेख हे जखमी झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथेही एका गटाने साहित्याची मोडतोड केली. वैजापूर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.