सुहास सरदेशमुख
शहरातील बहुतांश कामगार वर्ग आता खेडय़ात गावी परतला आणि रोजगार हमीवरील संख्येत वाढ दिसू लागली आहे. विशेषत: बीड आणि हिंगोली जिल्ह्य़ात रोजगार हमीवरील उपस्थिती वाढत आहे. मराठवाडय़ात सध्या ८८ हजार १५४ मजूर उपस्थित आहेत. या वेळी प्रतिदिन हजेरीमध्ये वाढ झाली असून तो दर आता २३८ रुपये एवढा झाला असून मराठवाडय़ात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विहिरींच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे. सध्या दोन हजार १७९ विहिरींची कामे हाती घेण्यात आली असून त्यातील ५९ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात झाली तर या कामाची गतीही मंदावेल, असे सांगण्यात येत आहे.
पुणे आणि मुंबईहून सुमारे सरासरी एका गावात १०० ते ५०० कामगार परत आले आहेत. त्यांचे विलगीकरणही करण्यात आले. आता या सर्वाना काम देणे आवश्यक असल्याने रोजगार हमीची कामे हाती घेतली जात आहेत. गेल्या उन्हाळयात जलयुक्तशिवार योजनेची कामे मराठवाडय़ात सुरू होती. ती कामे थांबली. त्यामुळे नव्याने वैयक्तिक कामांवर भर देण्यात आला आहे. उस्मानाबाद, हिंगोली, बीड या जिल्ह्य़ांमध्ये गेल्या आठवडय़ामध्ये रोजगार हमीवर ६५० ते ८०० मजूर वाढले आहेत. बीड जिल्ह्य़ात ऊसतोडीनंतर आलेल्या मजुरांची संख्याही अधिक असल्याने त्यांच्याकडून कामाची मागणी होत. मराठवाडय़ातील पाणीसमस्या लक्षात घेऊन विहिरींची कामे वाढविण्याचे ठरविण्यात आले. गेल्या काही दिवसांत दोन हजार ८९९ विहिरींच्या स्थळपाहणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्य़ात सर्वाधिक १७ हजार ४०५ मजूर असून जालना जिल्ह्य़ात १३ हजार १८३, तर उस्मानाबाद जिल्ह्य़ात १२ हजाराहून अधिक रोजगार उपस्थिती आहे. शेतावरची बांधबंदिस्तीची कामेही हाती घेण्यात आली आहेत.
मराठवाडय़ात जून महिन्यामध्ये मशागतीची कामे सुरू असतात. एरवी वेळेवर पाऊस येत नसल्याने रोहयोवरील मजुरांची उपस्थिती अधिक असते. मात्र, गेल्या आठवडय़ापासून चार हजारांहून आधिक मजुरांची भर पडत आहे.
– राजेंद्र आहिरे, महात्मा गांधी रोजगार हमी योजना