छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राज्यातील शासकीय ४१ आणि २३ खासगी महाविद्यालयातील प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची पहिली यादी १४ ऑगस्टला प्रकाशित करण्यात आली. त्याच्या विश्लेषणानंतर आणि त्यात सर्वाधिक १ हजार २०३ प्रवेश एकट्या लातूर जिल्ह्यातील परीक्षार्थींचे आहेत. लातूर पाठोपाठ नांदेडमधून ९३०, मुंबईतून ७८४ आणि छत्रपती संभाजीनगरमधून ४९९ जणांचा समावेश आहे. या वर्षी पुन्हा लातूर पॅटर्नने राज्यात झेंडा उंचावल्याचे दिसून आले आहे. राज्यात खासगी व्यवस्थापनासह अखिल भारतीय कोट्यासह ९०६८ जागा आहेत. यात लातूर आणि नांदेडचा पहिल्या यादीत २४ टक्के हिस्सा दिसून येत आहे.

राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे म्हणाले, ‘ गेली अनेक वर्ष अभ्यास करण्याचे तंत्र आता पूर्णत: रुजले आहे. प्रत्येक मुलाच्या अभ्यासाचा आलेख येथे ठेवला जातो. परिणाम असा आहे की, ‘या वर्षी पहिल्या यादीत ऑल इंडिया मेडिकल सायन्सच्या अर्थात एम्समध्ये प्रवेशपात्र ठरणारे ३५ मुले या महाविद्यालयातील आहेत. जसजशी यादी पुढे सरकेल तसतसे केवळ एका महाविद्यालयातून ५०० मुले वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतील.’ सकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत अभ्यास कसा करावा आणि करून घ्यावा यासाठी खास प्रयत्न केले जातात. अनेक महाविद्यालयांमध्ये आता बिहार, उत्तर प्रदेशातून अध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एखादा मुद्दा कोणते शिक्षक चांगले शिकवतात, त्याचा विचार या महाविद्यालय आणि शिकवणी वर्गातून केला जात असल्याने लातूरच्या यशाची कमान चढतीच असल्याचे दिसून येत आहे.

वैद्यकीय प्रवेश मिळविताना येणाऱ्या अडचणी सोडवून पालकांना या अनुषंगाने मार्गदर्शन करणारे ‘ॲडमिशन इझी’चे सचिन बांगड म्हणाले, ‘खरे तर या वर्षी पात्रता परीक्षांची काठिण्य पातळी अवघड होती. तरीही लातूरच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. एखाद्या राज्यात एकाच जिल्ह्यातून असे यश सातत्याने राखणे हा खरा लातूर पॅटर्न आहे. पण या वर्षी वैद्यकीय प्रवेशातील एकूण प्रवेशापैकी २४ टक्के जागांवर लातूर आणि नांदेडचा वाटा आहे.’