सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडयात शिवसेनेचा (शिंदे गट) एक खासदार आणि दहा आमदार आहेत, तरीही जागा किती मिळणार व उमेदवार कोण, हे मात्र अद्याप ठरता ठरेना, असे चित्र आहे.

धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या लोकसभा जागांचा पेच वाढला आहे. या तिन्ही लोकसभा मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींनी आता ‘चला मुंबईला जाऊ’ हे सूत्र स्वीकारले आहे. शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तळ ठोकून आहेत.

हिंगोलीचे हेमंत पाटील हे शिंदे गटाचे एकमेव खासदार. त्यांनी उमेदवारीसाठी केलेला दावा टिकतो की नाही? असा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे. खासदार हेमंत पाटील यांच्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदे गटाचे पाच आमदार. पालकमंत्री संदीपन भुमरे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, प्रा. रमेश बोरनारे या मंडळींनी उद्धव ठाकरे यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. या यादीमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, बालाजी कल्याणकर यांची भर पडली. त्यामुळे हिंगोली, उस्मानाबाद आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागांवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे.

हेही वाचा >>> महायुतीत कुणालाही उमेदवारी मिळो, ताकदीने काम करावे लागेल – आमदार मकरंद पाटील

मराठवाडयातील आठ जिल्ह्यांपैकी लातूर, बीड, परभणी, जालना या जिल्ह्यांत शिंदे गटाला समर्थक मिळाले पण त्यांचे राजकीय वजन तुलनेने कमी आहे. जालन्याचे अर्जुन खोतकर वगळता अन्य तीन जिल्ह्यांत शिंदे गटाची फारशी वाढ झाली नाही. त्यामुळे ज्या जिल्ह्यांत उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने गद्दारी झाली त्या हिंगोली, धाराशिवमध्ये त्यांनी विधानसभा मतदारसंघात सभा घेतल्या. उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा धडाका उडवून दिला असताना शिंदे गटाच्या उमेदवारीचे काही ठरेना.

मुंबईत जोर-बैठका

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते विनोद पाटील यांचे नाव चर्चेत ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला नाही. धाराशिवमधून मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे लढण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले होते. या मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारसभाही घेतल्या. मात्र, लोकसभेच्या कोणत्या जागेवर दावा सांगायचा आणि तेथून उमेदवार कोण, हे त्यांना ठरवता आलेले नाही. त्यामुळे नेते आता मुंबईत ‘जोर- बैठका’ काढत आहेत.