छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठतील अनागाेंदी कारभाराच्या अनेक तक्रारी असून श्रेयांक कमी असणाऱ्या अपात्र विद्यार्थ्यासही पदवी प्रमाणपत्रे दिली गेली. केवळ एवढेच नाही तर २१ हजार ६७३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यास विद्या परिषदेची मान्यता असली तरी केवळ १६ हजार जणांचे पदवी प्रमाणपत्र छापई करुन पदवीदान समारंभास राज्यपालांना आमंत्रित करण्यात आले. मात्र, पदवी प्रमाणपत्राच्या अनागोंदी कारभाराबाबत राज्यपाल नियुक्त सदस्यांनी लेखी तक्रारी केल्यामुळे मे महिन्यात घेण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्यपालांची उपस्थिती नव्हती. या सर्व प्रकरणास कुलगुरु कारभारी काळेही जबाबदार असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी राज्यपाल व शासन नियुक्त पाच सदस्यांनी पुन्हा केली आहे.

वसमत तालुक्यातील हट्टा महाविद्यालयातील विद्यार्थ्यास एकूण श्रेयांक मूल्य दिलेले नसतानाही पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. या अनुषंगाने लोणेरे विद्यापीठ प्रशासनास पत्रव्यवहारही करण्यता आला. अशाच पद्धतीने तीन विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. या तिन्ही विद्यार्थ्यांचे गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र ‘ लोकसत्ता’ कडे उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पात्र असताना पदवी प्रमाणपत्र दिले गेले नाही. औषधी निर्माण शास्त्र आणि अभियांत्रिकी शिकणाऱ्या पाच हजार ६२३ विद्यार्थ्यांना अद्यापि पदवी प्रमाणपत्र देण्यात आलेली नाहीत असा आरोप करणारे पत्र विनितकुमार डोंगरे, प्रवीण सरदेशमुख, अशोक शेल्लाळकर, डॉ. रंगनाथ होळंबे व योगेश बोंपलवार यांनी राज्यपालांना पुन्हा पाठवले आहे. लोणेरे विद्यापीठातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी या पूर्वी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या अहवालावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही, असे अशोक शेल्लाळकर म्हणाले.

तिसऱ्या सत्रात प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. एम. टेक यांत्रिकीच्या विद्यार्थ्यांबाबत ही बाब घडली असून अनेक नापास विद्यार्थ्यांनांही पदवी प्रमाणपत्रे दिली आहेत. केवळ एवढेच नाही पदवी प्रमाणपत्राबाबत अनेक प्रशासकीय त्रुटी लक्षात आल्या आहेत. या अशा प्रशासकी त्रुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी विद्यापीठ प्रशासन गंभीर नाही, असा संदेश जात असून यात राज्यपालांनी लक्ष घालावे असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या पूर्वी कुलगुरुंच्या कारभाराबाबत सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्या अहवालावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी कारवाई करावी, अशी विनंती करणार असल्याचे बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे सदस्य शेल्लाळकर म्हणाले. विद्यापीठाचे निकाल वेळावर लागत नाहीत. नोकर भरती केली जात नाही. सलग्नता देताना सुविधांची पाहणी करा, अशा सूचना केल्या पण आम्ही दिलेल्या सूचनांकडे लक्ष दिले जात नाही. असेही सदस्यांनी सांगितले.

पदवी प्रमाण देताना अनेक प्रकारचे घोळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठामध्ये झाले आहेत. आता सॉफ्टवेअर बदलण्यात आले. पदवीपत्र दिल्यानंतर भरपूर त्रुटी आहेत. त्या त्रुटी कमीत कमी व्हावे. विद्यापीठ प्रशासनाने कमीत कमी चुका कराव्या. अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे राज्यपालांना लिहिले आहे. त्यामुळे प्रशासनात काही बदल होतील, असे अपेक्षित आहे. अनेक सलग्न महाविद्यालयाचे सत्र संपले नाहीत तर मुंबई विद्यापीठात दुसरे सत्रही सुरू केले आहे. आता दुसरे सत्र सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनितकुमार डोंगरे, राज्यपाल नियुक्त सदस्य, कार्यकारी समिती