छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अतिवृष्टीग्रस्ताना केंद्र सरकारकडून मदत देण्यासाठी अधिकाऱ्यांचे पाहणी पथक सोमवारी व मंगळवारी (दि. ३ व ४) राज्यात येणार आहे. या पथकात सात अधिकारी असून चार नोव्हेंबर रोजी ते काही ठिकाणी नुकसानीची पाहणी करतील अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आल्या आहेत.
कृषी विभागाचे संचालक व कापूस विकास मंडळाचे डॉ. ए. एल. वाघमारे, जलशक्ती मंत्रालयाचे कंद्रप व्ही. पटेल, सत्येंद्र प्रताप सिंग, विशाल पांडेय, अभिषेक कुमार करण सरीन, डॉ. एसव्हीएसपी शर्मा असे या पथकातील अधिकाऱ्यांची नावे आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितल्यानंतर नुकसानीचे स्वरूप तपासणीसाठी हे अधिकारी येणार असल्याचे सांगण्यात आले.
मराठवाड्यात या वर्षी झालेल्या पावसामुळे नदीचे प्रवाह बदलले. गावच्या गावे पाण्याखाली गेली. हजारो एकरावरील जमीन खरवडून गेली. त्यामुळे शेतकरी हैराण झाला. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ जाहीर केले असले तरी त्याची काही रक्कम केंद्र सरकारकडून मिळणार आहे. अशी मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. आता मदतीपूर्वी स्थितीची पाहणी करण्यासाठी किती घरांचे नुकसान झाले, किती विहिरी गाळाने भरल्या. किती शाळांना व आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नुकसान झाले, वीज वितरणाचे पायाभूत नुकसान झाले याचे आकडे राज्य सरकारकडे जिल्हा प्रशासनाने कळविले असले तरी त्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी अधिकाऱ्याचे हे पथक येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा दौरा होणार असला तरी त्याचे अधिकचे तपशील मिळणे अद्याप बाकी आहेत, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणाले.
