छत्रपती संभाजीनगर : दुबईत आपल्या सासऱ्याचा व्यवसाय असून, त्यात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची ५ कोटी ७७ लाख ५७ हजार १०३ रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात फसवणूक झाली त्यांनाही इतरांकडूनही वरीलप्रमाणे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ठेवी घेण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार सिटी चौक पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर शेख रियाज गुलाम रब्बानी व सय्यद अनिस रजवी या जावई-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी सादर केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी नामंजूर केला.

या प्रकरणी सलमान लियाकतखाँ पठाण यांनी फसवणूक झाल्याच्या संदर्भाने तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार शेख रियाज यांनी परताव्याच्या आमिषाखाली ९ ते १२ टक्के व्याजदराने ठेवी घेण्यास पठाण यांना प्रवृत्त केले. पठाण यांच्याकडून वेगवेगळ्या वेळी एकूण ५ कोटी ७७ लाख ५७ हजार १०३ रुपये घेतले. रियाज यांनी त्यांचे सासरे सय्यद अनिस रजवी यांचा दुबई येथे व्यवसाय असून त्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आपल्यासह ठेवीदारांना आमिष दाखवले होते. गुंतवणूक केल्यानंतर बराचकाळ लोटूनही परतावा न मिळाल्याने तक्रारदारांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. सासरे-जावई असलेल्या आरोपींनी रक्कम देण्यास नकार दिला. तसेच शेख रियाज यांनी आणखी दोन व्यक्तींनाही अशाच प्रकारे गुंतवणुकीचे आमिष दाखवून ३५ लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण ६ कोटी ९ लाख ५७ हजार १०३ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी शेख रियाज आणि सय्यद अनिस या दोघांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. अर्जाच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी लोकाभियोक्ता अॅड. एन. आर. काहाणे आणि फिर्यादीच्या वतीने अॅड. आनंद देशपांडे यांनी युक्तिवाद करुन आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध दर्शवला. सुनावणीअंती न्यायालयाने दोघा आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला.