छत्रपती संभाजीनगर : पूर नियंत्रणाची सूचना देण्यासाठी दवंडी देण्याची जुनी प्रथा मोडीत निघणार असून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ‘ ड्रोन’ च्या आधारे सूचना देणारे ध्वनीवर्धक वापरले जाणार आहेत. संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पातळीवर असे ‘ड्रोन’ उपलब्ध असून अन्य हिंगोली, परभणी , बीड जिल्ह्यात असे ड्रोन घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ड्रोनच्या आधारे पूररेषेबाहेरील काही गावांमध्येही धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना देता येऊ शकेल, अशी चर्चा मान्सून पूर्व आढावा बैठकीत करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर विभागात ६५५ गावे पूरप्रवण आहेत. याशिवाय काही गावांमध्येही सूचना द्यावयाची असल्याने सुमारे १२०० पेक्षा अधिक गावात सूचना द्याव्या लागतात. एवढ्या गावांना सूचना देण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर घेण्यात आलेल्या ड्रोनचा उपयोग करता येऊ शकेल, अशी सचूना नांदेडचे पाेलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केली. तसेच संभाजीनगरमध्येही अशा प्रकारची यंत्रणा तयार असल्याचे सांगण्यात आले. ‘ड्रोन’ च्या सहाय्याने सूचना देणे आता शक्य असल्याने अन्य जिल्ह्यात पोलीस उपविभागीय स्तरावर ‘ ड्रोन’ खरेदी करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ‘ लोकसत्ता ’ शी बोलताना सांगितले.
मराठवाड्यातन गोदावरी, बोर, खाम, दुधना, मासोळी, करपरा, पूर्णा, गोदावरी, पैनगंगा, मांजरा, रेणा, सिंदफणा, बिंदूसरा, तेरणा, बोरी आदी नद्या आहेत. यामध्ये पैठण येथील नाथसागर आणि नांदेड येथील विष्णुपुरी येथून होणारा विसर्ग तसेच गोदावरी नदीतील उच्च पातळी बंधाऱ्यावरुन होणारा विसर्ग याची माहिती पूरस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मिळावी म्हणून ड्रोनचा वापर केला जाईल. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या जातील, असा निर्णय मान्सून पूर्व आढावा बेठकीत घेण्यात आला.
बीडमधील वीज अटकाव यंत्राची तपासणी
मराठवाड्यात सर्वाधिक वीज अटकाव यंत्राचा बीड जिल्ह्यात असून त्याचा खरोखर लाभ होतो का, याची तपासणी करुन त्याचे विश्लेषण करण्याचे आदेशही विभागीय आयुक्तांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या यंत्राचा खरोखर प्रभाव पडतो का, अधिक अटकाव यंत्रे असणाऱ्या भागात वीज पडली होती का, हे तपासून पाहिले जाणार आहे. या यंत्राचा प्रभाव असेल तर या यंत्राची संख्याही वाढवता येऊ शकेल, असेही गावडे म्हणाले. मराठवाड्यात ८७५ धरणे असून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्या यंत्रणेने काय काम करावे, या बाबतच्या सूचना या बैठकीत ठरविण्यात आले.