छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. धाराशिव, लातूर जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस झाला. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे भिंत कोसळून एक जण जखमी झाला असून, लातूर व धाराशिवमध्ये वीज पडून जनावरांचे मृत्यू झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याचे शेतकरी रमेश अमनर म्हणाले, ‘पावसामुळे हायब्रीड पूर्णत: गेले आहे. पाऊस थांबायचे नाव घेत नाही. सोयाबीन भिजल्याने अनेक ठिकाणी मोड आले आहेत. पिके तर हातची गेली आणि मशागतीसाठीही हाती वेळ नसल्याचे शेतकरी सांगतात. धाराशिव जिल्ह्यातील आरळी येथे शहाजी काशीनाथ मोरे हे भिंत पडून जखमी झाले.
लातूर जिल्ह्यात जनावरे दगावली आहेत. मुखेड तालुक्यात तेंदू पत्ता गोळा करणाऱ्या मजुराचेही मोठे नुकसान झाले आहे. ६० पानांचा एक पुडा २७० रुपयांना मिळत असे. पाने भिजल्याने मोठे नुकसान झाल्याचे हाळणी गावचे शेतकरी संतोष हेसे यांनी सांगितले. दिवसभर आभाळ भरून आले आहे. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, असे वातावरण मराठवाड्यात आहे.