राज्य सरकारने आपणास २०१३-१४ साठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. माझ्यासाठी ही बाब आनंदाची असली, तरी मराठवाडय़ात अजूनही क्रीडा संस्कृती रुजत नाही याची खंत वाटते, अशी भावना गणपतराव माने यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
राज्यात अजूनही खेळाकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. खेळासाठी, शाळांसाठी पुरेशी व चांगली मदाने नाहीत. क्रीडासाहित्य नाही. पुरेसे क्रीडाशिक्षक नाहीत व मुळात खेळाची आवडही नाही. राज्य सरकारने खेळाडूंसाठी ५ टक्के आरक्षण दिले. मात्र, याचा लाभ पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक अशा मोठय़ा शहरांतील खेळाडू घेतात. मराठवाडय़ात औरंगाबादवगळता याचा लाभ खेळाडूंना मिळत नाही. ग्रामीण भागात अनेक खेळाडू आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची गरज असून आपल्या कारकीर्दीत आपल्याला हे समाधान मिळाल्याचे माने म्हणाले.
महाविद्यालयीन शिक्षणात आपल्याला कबड्डी व व्हॉलिबॉल या खेळांची आवड होती. सेनादलात भरती झाल्यानंतर बॉिक्सग व बास्केटबॉल हे खेळ शिकता आले. लातूर जिल्हय़ातील अहमदपूर येथील महात्मा फुले विद्यालयात दोन वष्रे क्रीडाशिक्षक म्हणून काम केले. यानंतर महात्मा गांधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालो. १९७३ ते २००२ दरम्यान क्रीडाक्षेत्रात अनेक चांगली कामे करता आली. १९८६-८७ मध्ये राज्य सरकारने छत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन आपला गौरव केला.
अहमदपूरसारख्या छोटय़ा गावात राहूनही कबड्डी, खो खो, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, तलवारबाजी, नेटबॉल अशा खेळांत योगदान देता आले. हँडबॉल, कबड्डी व बास्केटबॉलमध्ये राज्यस्तरीय संघटनेचे प्रत्येकी पाच वष्रे उपाध्यक्ष म्हणून काम केले. अहमदपूरच्या सुमारे ३५० खेळाडूंनी विद्यापीठ स्तरावर विविध खेळांत सहभाग दिला. २०० खेळाडू राज्याच्या संघात सहभागी झाले. अनेक विद्यापीठांत क्रीडा संचालक म्हणून आपले विद्यार्थी कार्यरत आहेत. याचे मात्र आपल्याला मनस्वी समाधान असल्याचे माने यांनी सांगितले.