दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारात ग्राहकांची गर्दी ओसंडून वाहात असल्याचे चित्र बुधवारी होते. लातूरच्या गंजगोलाई परिसरातील बाजारपेठेत पायी चालणेही कठीण झाले होते. बुधवारी लक्ष्मीपूजन व उद्या (गुरुवारी) पाडवा यामुळे दोन्हींपकी एका दिवशी व्यापारी आपल्या प्रतिष्ठानाची पूजा करतात, तर घरोघरी लक्ष्मीपूजनाची तयारी असते. झाडू, झेंडूची फुले, केळीचे खांब, कच्ची फळे, चुरमुरे, फुटाणे, बत्तासे खरेदीकडेही लोकांचा अधिक कल होता.
भारतीय परंपरेत स्वच्छतेचे महत्त्व पूर्वापार आहे. दसऱ्यापूर्वी घरोघरी स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. त्यानंतर देवीची प्रतिष्ठापना होते.
दिवाळीनिमित्त केल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूच्या पूजेचा मान आहे. झाडूचे कितीही आधुनिक प्रकार आले, तरी या दिवशी ‘फडय़ा’ला अधिक महत्त्व असते. िशदीच्या पानापासून तयार केल्या जाणाऱ्या फडय़ाला अधिक मान असतो. या वर्षी या फडय़ाची किंमत ७५ रुपयांपर्यंत वधारली होती. आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवरून मोठय़ा प्रमाणावर झाडू विक्रेते लातुरात दाखल झाले होते.
केळीचे खांब व नारळाच्या फांद्यांना लक्ष्मीपूजनानिमित्त मोठी मागणी असते. बुधवारी पहाटेपासूनच मालमोटारी, ट्रॅक्टर व विविध वाहनांतून बाजारपेठेत हा माल दाखल झाला. छोटय़ा वाहनांतून प्रत्येक दुकानासमोर हा माल विक्रीस उपलब्ध झाला. शहरातील औसा रस्ता, अंबाजोगाई रस्ता, बार्शी रस्ता अशा प्रमुख मार्गावर हा माल विक्रीस उपलब्ध होता. दुपारी बारापर्यंत मालाची हातोहात विक्री झाली.
झेंडूच्या फुलांनाही नेहमीप्रमाणेच मोठी मागणी होती. पिवळय़ा, भगव्या झेंडूची फुले हे बाजारपेठेचे मुख्य आकर्षण होते. ८० ते १०० रुपये किलोपर्यंत भाव फुलांना मिळाला. लातूर परिसरात अनेक शेतकरी फुलशेती करीत आहेत. या शेतकऱ्यांना या वर्षी फुलाचे चांगले पसे मिळाले. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने कच्च्या फळांचा मान पूजेसाठी असतो. डाळींब, केळी, सीताफळे, गजगा या फळांसह विविध फळांची पानेही पूजेसाठी वापरली जातात.
फळाबरोबरच प्रसादाचे स्वतंत्र स्टॉल्सही बाजारपेठेत उपलब्ध होते. सर्वच ठिकाणी लोकांना पॅकेजची सवय लागली आहे, त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व पूजेचे साहित्य उपलब्ध करणारे स्टॉल्सही विक्रेत्यांनी उभारले होते. संगणकाच्या जमान्यातही खातेवहीचे महत्त्व कमी झाले नाही. याही वर्षी खातेवही खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली होती. दुष्काळी स्थितीमुळे बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन कोणत्याही मालाच्या भावात फारशी वाढ झाली नसल्याचे चित्र होते. दिवाळीत कपडे खरेदी, फटाके याला एक वेळ फाटा दिला जातो. मात्र, पारंपरिक पूजेचे महत्त्व घरोघरी अधिक असल्यामुळे ही पूजा भक्तिभावाने साजरी केली जात असल्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होती.