छत्रपती संभाजीनगर : राज्यात येत्या जून महिन्यात सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत (सीबीएससी) अभ्यासक्रम शिकवण्यात येत असतानाच सैनिकी शाळांमध्ये मात्र, यंदा जुन्या प्रचलित राज्य शिक्षण मंडळाच्या शिक्षण पद्धतीनुसारच शिक्षण देण्यात येणार आहे. सीबीएससीतील शिक्षण पुढील वर्षीपासून देण्यात येणार असल्याची माहिती येथे मिळाली.
यासंदर्भाने सातारा येथील सैनिकी स्कूलमध्ये नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीस शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण सचिव व शिक्षण आयुक्तांसह राज्यातील सर्व ३९ शाळांचे प्रतिनिधी, संस्थाचालक आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढील वर्षीपासून सीबीएससीची शिक्षण पद्धती सुरू करण्याचा निर्णय झाल्याची माहिती येथील जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेचे राजे संभाजी भोसले सैनिक स्कूलचे सचिव जयप्रकाश गुदगे यांनी दिली.
बैठकीचा मुख्य आधार ९ ऑक्टोबरच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अध्यादेशाचा होता. या अध्यादेशानुसार नवीन शैक्षणिक धोरणानुसार सीबीएससीच्या शिक्षणासाठी केंद्र स्तरावरून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, सैनिकी शाळांना परवानगी मिळवण्यासाठी वेळ लागणार असून, चालू वर्षातील शैक्षणिक वर्ष अगदीच तोंडावर आलेले आहे. एवढ्या कमी कालावधीत केंद्र स्तरावरून सीबीएससीसाठी परवानगी मिळणार नाही. सैनिकी शाळांचीही सीबीएससीअंतर्गत अभ्यासक्रम शिकवण्याची अद्याप तयारी झालेली नाही.