निलंगेकर, लोणीकर आणि सावे यांनी गड राखला, सावंत विजयी
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी झंझावाती दौरे करत प्रतिष्ठेच्या केलेल्या मंत्र्यांविरुद्धच्या जागांवर दिलेले लक्ष यामुळे परळीमधून पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, अर्जुन खोतकर हे मंत्री पराभूत झाले. लक्षणीय ठरलेल्या परळी विधानसभा मतदार संघात पंकजा मुंडे यांना ३० हजार ७६८ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या मतदार संघात एक लाख २१ हजार १८६ मते मिळाली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संभाजी पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर, तानाजी सावंत आणि अतुल सावे या मंत्र्यांना मात्र विजय राखता आला. त्यात संभाजी पाटील यांना मिळालेली मते लक्षणीय आहे.
परळी मतदार संघात स्थानिक समस्यांकडे मंत्री असतानाच्या कालावधीत पंकजा मुंडे यांनी केलेले दुर्लक्ष, त्यांच्याकडून मिळणारी वागणूक याचा परिणाम म्हणून धनंजय मुंडे यांना निवडून देण्याचा परळीकरांनी जणू निर्धार केला होता, असे निकालातून स्पष्ट होत आहे. पंकजा मुंडे यांना ९० हजार ४१८ मते मिळाली.
सलग दोनदा मंत्री राहिलेले अर्जुन खोतकर आणि जिल्हा परिषद व बाजार समिती ताब्यात असल्यामुळे नाराजांचा एक वर्ग तयार झाला. परिणामी खोतकरांपेक्षा काँग्रेसचे कैलास गोरंटय़ाल अधिक प्रभावी ठरले. त्यांना ९१ हजार ८३५, तर खोतकर यांना ६६ हजार ४९७ मते मिळाली.
जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, पुतणे संदीप क्षीरसागर यांनी त्यांना लढत दिली. ते विजयी झाले. बीड जिल्ह्य़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सभा घेतल्या होत्या. पण त्यांच्या वाणीचाही प्रभाव या वेळी मंत्र्यांना तारू शकला नाही.
परतूर मतदार संघात बबनराव लोणीकर यांना वॉटरग्रीडच्या प्रचारामुळे यश मिळाल्याचे दिसून येत आहे. तर अटीतटीची मानली जाणारी लढत हरिभाऊ बागडे यांनी जिंकली. ते १५ हजार ११६ मतांनी विजयी झाले. डॉ. कल्याण काळे यांना ९० हजार ५३९ मते मिळाली. गेल्या निवडणुकीत ते केवळ ३६११ मतांनी निवडून आले होते. राज्यमंत्री अतुल सावे यांनीही १४ हजार २१६ मतांनी एमआयएमचे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांचा पराभव केला.
सावे यांच्या विजयामुळे औरंगाबादमधून एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वेळी सावे यांनी ४ हजार २६० मतांनी विजय मिळवला होता. संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचे परंपरागत विरोधक अशोक पाटील निलंगेकर यांचा ३२ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. २०१४ मध्येही त्यांना २७ हजार ५११ मताधिक्य मिळाले होते. परंडा मतदार संघातून तानाजी सावंत यांनी राहुल मोटे यांचा ३२ हजार ७०२ मतांनी पराभव केला.