औरंगाबाद : राज्यात निवडलेल्या आदर्श शाळांच्या पायाभूत आणि शैक्षणिक आवश्यक सुविधांवर ३०० कोटींचा निधी राज्य सरकारकडून खर्च करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी सोमवारी येथे दिली. या उपक्रमात लोकसहभागाचीही मदत घेतली जाणार आहे. या शाळांमध्ये इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशातील पहिली आयएसओ जिल्हा परिषद केंद्रीय शाळा सातारा (जि.औरंगाबाद) येथे शाळापूर्व तयारी मेळावा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, आमदार प्रशांत बंब, माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह शिक्षण विभागातील राज्य, विभागीय पातळीवरील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळोमध्ये विद्यार्थी संख्या वाढत आहे. राज्यात दरवर्षी १९ लाख विद्यार्थी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतात. असरचा अहवालही सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढत असल्याचे सांगत आहे, याकडे लक्ष वेधत प्रा. गायकवाड यांनी, शाळापूर्व तयारी मेळाव्यासारख्या उपक्रमातून शाळातून विद्यार्थी गळती होण्याचे प्रमाण घटणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

निजामकालीन शाळांसाठी १६० कोटी

निजामकालीन शाळांसाठी १६० कोटींचा निधी राजमाता शैक्षणिक उपक्रम योजनेंतर्गत देण्यात येणार आहे. त्यातील ९२ कोटींचे वितरण करण्यात आल्याची माहितीही प्रा. गायकवाड यांनी याप्रसंगी दिली.

शाळांची वीजतोडणी नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची यापुढे वीज तोडणी होणार नाही. शाळांमध्ये अखंडित वीज राहण्यासाठी मंत्रिमंडळस्तरावर बैठकीत चर्चा झालेली असून गतवर्षी ७ कोटी तर येत्या शैक्षणिक वर्षांत १४ कोटींची पुरवरणी मागणी नोंदवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शैक्षणिक व्यासपीठावर राजकीय टोलेबाजी

शाळापूर्व तयारी मेळावा कार्यक्रमात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय टोलेबाजी चांगलीच रंगली. शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत, शाळाबाह्य होण्याचे सर्वाधिक प्रमाण मराठवाडय़ात असल्याकडे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी लक्ष वेधले. तर आमदार विक्रम काळे यांनी बोलताना प्रशांत बंब यांचा उल्लेख अच्छे दिन पक्षाचे आमदार म्हणून केला. तसेच शिक्षक मुख्यालयी राहण्याच्या मुद्दय़ाकडे लक्ष वेधत आमदार काळे यांनी पेट्रोल दरवाढीचा प्रश्न या व्यासपीठावर मांडला. या दोघांनाही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी चांगलेच फटकारत ज्या शिक्षकांना शक्य आहे ते मुख्यालयी राहतील, असे स्पष्ट केले. तर आमदार काळे यांना तुम्ही तर या कार्यक्रमात विधिमंडळात बोलल्यासारखे बोलत असल्याची जाणीव करून दिली.