औरंगाबाद शहरातील करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तीन हजार ३४० रुग्णांपैकी १७८१ रुग्ण बरे झाले असून विविध रुग्णालयांत १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय असून टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यानंतर दररोज ९० ते १२० रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या २१ हजारांपर्यंत वाढू शकेल असा काही संस्थाचा दावा होता. मात्र, असे घडले नाही. या पुढे संस्थात्मक अलगीकरणावर भर दिला जाणार आहे. शनिवारी १०२ रुग्णांची वाढ झाली. गेल्या १९ दिवसांत १०६ जणांचा मृत्यू झाले आहेत. मृत्यूचा हा दर ५.५७ एवढा झाला आहे.
येत्या काळात करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विलगीकरणाचे प्रमाण वाढविले जाणार असून त्यासाठी शहरातील मंगल कार्यालयात ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिली. गेल्या १९ दिवसांत एक हजार ६७७ रुग्ण आढळले आहेत. टाळेबंदीनंतरची सरासरी रुग्ण आढळून ८८.२६ एवढी आहे. वाढत जाणारे मृत्यू रोखण्यासाठी वयोवृद्धांची काळजी घेण्यासाठी महापालिकेकडून सर्वेक्षण केले जात आहे. त्याचबरोबर शहराभोवतालच्या गावात उद्रेक होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. रुग्णसंख्या रोखणे आता शहरातील नागरिकांच्याही हाती असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. मुखपट्टी बांधणे, सतत हात धुणे ही उपाययोजना आवश्यक आहे. मात्र, शहरातील विविध भागात अनेक जण मुखपट्टी केवळ नावाला लावतात. परिणामी बोलताना उडणारे बाधितांच्या लाळेतील कण नव्याने संसर्ग होत असल्याचेही दिसून येत आहे.