शहरातील करोना रुग्णसंख्येच्या वाढीत गेल्या आठवडय़ापेक्षा काहीशी घट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. करोना रुग्णांच्या सख्येत शनिवारी २५ ने वाढ झाली यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा १२४३ वर पोहोचला आहे. तर शहरातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्याही दोनने वाढली आहे. शनिवारी सकाळी सिटी चौक भागातील ७२ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास किराडपुरा भागातील ७५ वर्षांच्या करोनाबाधिताचा मृत्यू झाला. घाटी  व खासगी रुग्णालयात झालेल्या या मृत्यूमुळे करोनाबळींची संख्या ४८ एवढी झाली आहे. दरम्यान वयोवृद्धांना जपण्यासाठी महापालिकेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक घरातील वृद्ध व्यक्तींचे सर्वेक्षण केले जात असून ज्यांना पूर्वीचे आजार आहेत, त्याची स्वतंत्र नोंद केली जात आहे.

शहरातील १२ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वरिष्ठ महसुली अधिकारी आता पायी गस्त घालत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रातील घरांमधून बाहेर पडण्याच्या सर्व वाटा अडविण्यात आल्या आहेत. उन्हाचा कडाका वाढल्यामुळेही लोक बाहेर पडत नाहीत. उन्हामुळे आता मदत होत असल्याचे गस्ती पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान गेल्या आठवडय़ात प्रतिदिन सरासरी ६० पर्यंत जाणारा करोनाबाधितांचा आकडा सरासरी ४० पेक्षा कमी झाला आहे. शनिवारी सकाळी करोना रुग्ण संख्येत २३ ने वाढ झाली. यामध्ये सादाफनगर, रहेमानिया कॉलनी, मेहमूदपुरा, औरंगपुरा, सिडको भागातील एन- आठ, एन-४ भागातील गणेशनगर, ठाकरेनगर, न्यायनगर, बायजीपुरा, पुंडलिकनगर, बजरंग चौक, एमजीएम परिसर, पहाडसिंगपुरा, भवानीनगर, तसेच ग्रामीण भागातील वडगाव कोल्हाटी येथे करोना विषाणूचे पाय पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासगी रुग्णालयातील खाटा अधिग्रहित

शहरातील एमजीएम व धूत या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. आता हेडगेवार, धूत, बजाज येथील खाटाही अधिग्रहित करण्यात येणार आहेत. करोना रुग्णांसाठी किती रक्कम आकारायची याचा एक शासन आदेशही मिळाला असून सर्व रुग्णालयाच्या प्रशासनाशी महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी चर्चा केली आहे. सर्व खासगी रुग्णालयातही आता करोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत. महात्मा फुले जनआरोग्य अभियानातूनही उपचार केले जाणार असून खासगी रुग्णालयात शुल्क नियमनासह करोनाबाधितांवर उपचार करणे अनिवार्य करण्यात आले होते.

उपचारांसाठी स्वतंत्र केंद्र

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सध्या गंभीर रुग्णांना दाखल करून घेतले जाते. मात्र, प्रसूतीसाठी आलेल्या अनेकजणींना नंतर समजते की त्यांना करोनाची बाधा आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे केले नाही तर गंभीर रुग्णांच्या जागेवर सौम्य किंवा कमी गंभीर लक्षणे असणारा रुग्ण खाट अडवून बसेल. त्यामुळे अन्य आजार दाखविण्यासाठी आले आणि अपघाताने करोना असल्याचे समजल्यानंतर करावयाच्या उपचारांसाठी स्वतंत्र केंद्र सुरू करता येते का, याची चाचपणी केली जात आहे. या वृत्तास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दुजोरा दिला.