सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : व्यावसायिकांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून २०१५ पासून सुरू असलेल्या ‘मुद्रा’ योजनेची थकीत कर्ज रक्कम आता ४,२३४ कोटी रुपये झाली आहे. हे प्रमाण एकूण कर्ज वितरणाच्या ११ टक्के असल्याची माहिती राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आली.

परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ३८ टक्के रक्कम थकीत आहे. त्या खालोखाल हिंगोली जिल्ह्यात २५ टक्के, तर जालना, बीड आणि मुंबईमध्येही ‘मुद्रा’ कर्ज थकवणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपूर्वी मुद्रा कर्जवाटपासाठी राजकीय जोर लावला जात असल्यामुळे ‘जरा थकबाकीकडेही लक्ष द्या,’ असे बँक अधिकाऱ्यांनी सुचवले आहे. 

हेही वाचा >>>छत्रपती संभाजीनगर : हायवा-दुचाकी अपघातात तीन बहीण-भावंडांचा मृत्यू

‘मुद्रा’ योजनेतून तीन श्रेणींत कर्ज दिले जाते. यामध्ये शिशू श्रेणीतून ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या श्रेणीमध्ये कर्जफेडीचे प्रमाण अधिक आहे. राज्यातील प्रलंबित आठ हजार ५०७ कोटी रुपयांपैकी ६४२ कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. हे प्रमाण केवळ आठ टक्के आहे. त्या पुढच्या श्रेणीतील कर्ज घेणाऱ्या म्हणजे रुपये ५० हजार ते पाच लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्यांचे थकीत कर्जाचे प्रमाण १४ टक्के आहे. या श्रेणीत २० लाख ६७ हजार २६३ खातेदारांपैकी दोन लाख २३ हजार ९५१ खातेदारांचे २,३५८ कोटींचे कर्ज थकीत आहे. या योजनेतून थेट १० लाख रुपये कर्ज मिळत असल्याने छोटय़ा उद्योजकांनी तरुण श्रेणीतून कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न केले. स्थानिक पातळीवर नेत्यांना शिफारशी करायला लावल्या. या श्रेणीत विविध बँकांचे १,२३४ कोटी रुपयांचे कर्ज थकलेले आहे. तरुण श्रेणीतील थकीत कर्ज रकमेचे प्रमाण १० टक्के असल्याचे अहवाल बँकर्स समितीकडे देण्यात आले आहेत. 

मराठवाडय़ातील परभणी, हिंगोली, बीड, जालना या जिल्ह्यांत कर्ज न फेडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परभणी जिल्ह्यात थकीत कर्जाचे प्रमाण दर वर्षी वाढत असल्याचे अग्रणी बँकांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील प्रमाण ११ टक्के

राज्यातील ६७ लाख ६२ हजार ८२३ मुद्रा लाभार्थ्यांना ३८ हजार ७८५ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले होते. त्यातील थकीत कर्जाचे प्रमाण ११ टक्के म्हणजे चार हजार २३४ कोटी एवढे आहे.