परभणी, हिंगोली : गेल्या काही दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. काल जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्यानंतर आज पुन्हा पावसाने हजेरी लावली. आज (शुक्रवारी) सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते, त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. भर दुपारी आकाश अंधारून आल्याचे वातावरण निर्माण झाले होते.
सध्या सोयाबीन, कापूस या दोन्ही पिकांची स्थिती चांगली असली, तरी सखल भागात, तसेच नदी व ओढ्याकाठच्या शेतात अजूनही पाणी साचलेले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी केली आहे.
विशेषतः पालम, सेलू, पाथरी, पूर्णा या तालुक्यांमध्ये हे नुकसान अधिक असून, आजही अनेक ठिकाणी शेतात गुडघ्याइतके पाणी साचल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीचे पंचनामे झाले असले, तरी अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. एवढेच नाही, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील पीक विम्याचे जाहीर झालेले पैसे मिळतील, अशी अपेक्षा असताना अजूनही ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
हिंगोलीत ‘जोर’धार हिंगोली व कळमनुरी तालुक्यांत शुक्रवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी एकच्या सुमारास अंधारून आले. मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. आधीच अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले असताना नव्याने पाऊस आल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात पावसामुळे कळमनुरी, वसमत तालुक्यात केळी, पपईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची नुकसानभरपाई अजून मिळालेली नाही. ऑगस्टमध्ये तर अनेक शेतकऱ्यांची जमीनही खरवडून गेली. आता पुन्हा पाऊस पडत असल्याने शेतकरी हवालदिल आहे.