छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा राज्यभर झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे फलक गुलाबी रंगात करण्याचा घाट छत्रपती संभाजीनगरात घालण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे शुक्रवारपासून मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर पक्षाची गुलाबी रंग संहिता असल्याचे दिसून येत आहे.
पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकांवरचा पार्श्वभाग गुलाबी रंगाने व्यापलेला असून, याच रंगाचा वापर करत प्रत्येक पदाधिकाऱ्याने पक्षाची एक विचारधारा पाळल्याप्रमाणे रंग संहिताही अनुसरल्याचे दिसते आहे.
क्रांती चौक, उच्च न्यायालयाच्या खंडपीठ चौक ते चिकलठाणा विमानतळापर्यंतच्या जालना रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या फलकातले गुलाबी रंग हे एक साम्य जपलेले असून पक्षाच्या विचारांप्रमाणे रंग संहिताही कसोशिने पाळल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान करण्यावर भर देत नवी रंग संहिता पाळण्यास सुरुवात केली होती. पक्षाचे अधिवेशन किंवा मेळावे, जाहीर सभा आदी कार्यक्रमांमध्ये सुद्धा गुलाबी रंगाला विशेष पद्धतीने ठसवण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या कार्यक्रमांमधील फलकांवर पांढरा, हिरवा आणि लाल, असे तिरंगी रंगसंगतीतील पार्श्वभाग, चिन्ह व अन्य भाग दिसायचा. तीन रंग हे पक्षाच्या विचारधारेशी जोडले होते. परंतु आता फलकांच्या रचनेमध्येही गुलाबी रंग केंद्रस्थानी आणून त्याचा पार्श्वभाग किंवा अधिक वापर रंग संहिता म्हणून आवर्जून जपल्याचे दिसून येत आहेत.
फलकांवर गुलाबी रंगासोबत निळ प्रकारातील निळा रंगही त्या फलकावर काही तुरळक ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे.कोणत्याही रंगामागे काही अर्थच्छटा जोडलेल्या असतात. काही प्रतीकं, संकेत रंगातून जपलेली असतात, असे चित्रकार सांगतात. अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटनंतर आता गुलाबी रंगाचे फलक शहरभर दिसू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात व जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद तशी कमीच. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली.
मात्र, नंतर ते अजित पवार गटात गेले. त्यांच्याकडे पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या मेळाव्याच्या पूर्वी गुलाबी संहिता करण्यात आली. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीची ही बांधणी किती उपयोग पडेल, याविषयीची उत्सुकता असली तरी छत्रपती संभाजीनगरातील राष्ट्रवादीचा गुलाबी रंग नजरेत भरणार असल्याचे दिसून येत आहे.