औरंगाबाद घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागातील चित्र 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागाची क्षमता ही ९० बेडची आहे. मात्र, दाखल होणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेता येथे २६१ बेडची (खाट) व्यवस्था करूनही अनेक महिलांना प्रसूतीनंतर बेड उपलब्ध होत नसल्याने जमिनीवरच जागा मिळत आहे. त्यातही शस्त्रक्रियेतून (सिझरिन) प्रसूत झालेल्या महिलांनाही जमिनीवरच घरातून आणलेल्या अंथरुणावरच उपचार घ्यावे लागत आहेत.

निवासी डॉक्टरांच्या संपकाळात पठण तालुक्यातील सोनाली गोटे या महिलेला प्रसूतीनंतर सहा तासांत घरी पाठवल्याने औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील प्रसूतीविभाग चच्रेत आला. या विभागात कायम अवघडलेल्या महिलांनाही पाय ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती असते. कक्षाच्या दारापासून ते बाथरूमपर्यंत प्रसूत झालेल्या महिला मिळेल तेथे जागा धरत उपचाराचे एक-दोन दिवस काढून परततात. जागेची अडचण घेऊन रुग्णालयातील परिचारिका, सेविकाही पुढे येणाऱ्या महिलांचा विचार करून आहे त्यांना घरी जाण्यातच कसे हित आहे, असा सल्ला देतात. औरंगाबादेतील मनपाच्या रुग्णालयांची स्थितीही व्हेंटिलेटरवर असल्यासारखी आहे. त्यामुळे शहरासह औरंगाबादच्या ग्रामीण भागातील व मराठवाडय़ाच्या सीमेनजीक असणाऱ्या जळगाव, नगर, विदर्भातील बुलडाणा या जिल्ह्यातूनही महिला येथेच प्रसूतीसाठी दाखल होण्यासाठी येतात. याशिवाय गर्भपिशवी, कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या महिलाही येथेच दाखल असतात.

प्रसूती विभागात बेडपासून ते डॉक्टरांपर्यंतचीच कमतरता दिसून येते. सहा डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. येथील कामाचा ताण पाहून कोणी येत नाही. दुसऱ्या कॅन्सर विभागात जाणे अनेक जण पसंत करतात. बेडच्या संख्येत डॉक्टर, परिचारिकांची नियुक्ती आहे. वेळेपूर्वी अथवा कमजोर अर्भकाला ठेवण्यासाठी इन्क्युबेटरही येथे केवळ सहाच असल्याचे सांगितले जाते.

प्रसूती विभागाला ९० बेडचीच मान्यता आहे. मात्र, येथे २६१ अन्य बेड चालवले जातात. ७० ते ८० महिला या दररोज प्रसूत होतात. त्यात १२ ते १३ महिला या सिझरिनच्या असतात. शहरासह ग्रामीण भागातीलही महिला येथेच येऊन प्रसूत होत असल्याने २०१६-१७ या वर्षांत १८ हजार २०६ तर २०१७ या वर्षांतील तीन महिन्यांत ३ हजार ९२१ प्रसूती झाल्या आहेत, अशी माहिती प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एन. गडाप्पा यांनी सांगितले.

मुलांचा जन्म अधिक

प्रसूती विभागात २०१५-१६ या वर्षांत ८ हजार ५७० मुले तर ७३७८ मुली, २०१६-१७ या वर्षांत ६६२७ मुले व ६ हजार २६२ मुलींचा जन्म झालेलाआहे. या दोन वर्षांत मुला-मुलींच्या जन्मदरात अनुक्रमे १ हजार १९२ व ३६५ एवढा फरक असल्याचे दिसतआहे.

सिझरिनचे प्रमाण अधिक

जागतिक आरोग्य संघटनेच्या (हू) मापदंडानुसार सिझरिनचे प्रमाण हे १० ते १५ टक्के असू शकते. मात्र, घाटीसारख्या शासकीय रुग्णालयातही सिझरिनचे प्रमाण हे २५ टक्के आहे. खासगी रुग्णालयात ते आणखी दिसून येते. वाढते सिझरिनच्या घटनांवरून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त होत आहे.

नवीन रुग्णालयाचे काय?

महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी पठण रोडवर एक जागाही निश्चित करण्यात आली आहे. मात्र, हा प्रकल्पही अद्यापही आकारास येऊ शकला नाही.

रिक्त जागा भरल्या

प्रसूती विभागातील डॉक्टरांच्या सहा जागांसाठी दोन दिवसांपूर्वीच मुलाखती झालेल्या आहेत. १ एप्रिलपासून ते रुजू होतील. इतरही समस्या मिटवण्यासाठी घाटीचे प्रशासन प्रयत्न करत असते.

चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता, घाटी.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnant women suffering problem in ghati hospital aurangabad
First published on: 04-04-2017 at 02:17 IST