छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसीतील अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर मंगळवारी पोलिसांकडून छापा मारून सुमारे ११६ तरूण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले. यातील शंभरवर तरुण-तरुणी हे परप्रांतातील असल्याची माहिती आहे. या संदर्भात अधिकृतपणे विस्तृत आणि सविस्तर माहिती पोलिसांकडून देण्यात आली नसली तरी अमेरिकेसह विदेशातील नागरिकांना कर सवलतीसंद विविधा आमिषे दाखवून फसवणूक करण्यात येत होती, अशी प्राथमिक माहिती आहे.

चिकलठाणा एमआयडीसीतील टी- ७ या ठिकाणी सकाळपासून पोलिसांचा मोठ्या बंदोबस्तात कारवाईचे सत्र सुरू असून, ८ मोठी वाहने, अधिकाऱ्यांची वाहने, दामिनी पथक, शीघ्र कृती दलासह फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या तरुण-तरुणींना न्यायालयात हजर करण्याची कार्यवाही सुरू आहे. के. एस. एन्टरप्रायजेस नावाच्या कंपनीखाली हे कॉलसेंटर सुरू होते. बाहेर देशातील नागरिकांकडून व्हीटीसी पद्धतीने रक्कम घ्यायचे, अशी माहिती आहे.

तीन मजली इमारतीच्या दोन मजल्यावरून रात्रपाळीत कॉलसेंटर सुरू होते. मूळचा मराठी पण दिल्लीत तीस वर्षे वास्तव्य केलेल्या मुळे नामक व्यक्तीची मूळ इमारत असून, त्याला कंपनीचा गोरखधंदा काय सुरू होता, याची माहिती नव्हती. परंतु पोलिसांना ५६ पानी एक करारनामा मिळाला असून, त्यामध्ये एक आयटी कंपनीअंतर्गत सॉफ्टवेअर व कॉल सेंटरची कामे करण्यात येणार असल्याचे नमूद असल्याची माहिती आहे.

घटनास्थळी प्रभारी पोलीस आयुक्त संदीप हिरेमठ, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, पंकज अतुलकर, गुन्हे शाखेचे गजानन कल्याणकर, एमआयडीसी सिडकोच्या पोलीस निरीक्षक गीता अरगडे आदिंसह अनेक अधिकाऱ्यांनी भेट दिली असून, यातील काही अधिकारी प्रत्यक्ष अजूनही कारवाईच्या प्रक्रियेत सहभागी आहेत.

ताब्यात घेतलेल्या तरूण-तरुणींना पोलीस कोठडी मिळाली तर कोठे ठेवायचे, असा प्रश्न पोलिसांपुढे आहे. ताब्यात घेतलेल्या तरूण-तरुणींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयात सायंकाळी पाचच्या आत हजर करून काहींना सोडून काहींना एक दिवसाची कोठडी मागितली जाईल, अशी शक्यता आहे.