छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील काही भागांत रविवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा कहर केला. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, बीडमधील पाटोदा, शिरूर, जालना शहर यांसह बहुतांश भागांत मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली. नदी – नाल्यांना पूर आला. गेल्या २४ तासांत चार जणांचा मृत्यू झाला. तर ७२ जनावरे दगावली आहेत. ८५ महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. पिके पाण्यात गेली आहेत. तर उत्तर महाराष्ट्रात जळगावमध्ये एक जण वाहून गेला
परंडा तालुक्यातील ढगपिंपरी, वडनेर या गावातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. सायंकाळपर्यंत २७ जणांना बाहेर काढण्यात आले तर आणखी १५० जण अडकलेले आहेत. याच तालुक्यात घरात पाणी शिरून ७० वर्षाच्या देवांगनाबाई नवनाथ वारे यांचा मृत्यू झाला.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पिंपळगाव येथील गोठ्यात बांधलेल्या २० गायी पुरामुळे दावणीला दगावल्या. भूम तालुक्यातील तीन गावांतील सहा कुटुंबांतील एकूण १४ जणांना पुराच्या पाण्यातून हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित बाहेर काढले. परंडा तालुक्यातील वागेगव्हाण, वडनेर आदी परिसरात अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व सैन्य दलातील जवान प्रयत्न करत होते. चांदणी, उलका, उल्फा या नद्यांना महापूर आला. रुई, दुधी, ढगपिंपरी, देवगाव (खु.), वडनेर, आवारपिंपरी, वागेगव्हाण परिसरातील नदीकाठी व वस्त्यांवर राहत असलेले अडीचशे ते तीनशेजण पाण्यात अडकल्याने या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
बीडमध्ये संततधार
बीड जिल्ह्यात पोटदा, आष्टीमध्ये जोरदार पाऊस झाला. बीड तालुक्यातील सात्रा-पोतरा, लंबा-रुई, शिरुर तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब, शिरपूर गात. कोळवाडी, महासांगवी, भिल्लवस्ती या गावांचा संपर्क तुटलेला आहे. या गावांतील १५ जणांना आपत्ती निवारण पथकाने सुरक्षितस्थळी हलवले. मांजरा धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
जालन्यातही हजेरी
जालना जिल्ह्यात सर्वत्र २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री जोरदार अतिवृष्टी झाली. यामुळे विरेगाव येथील १४ नागरिक पुरात अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांच्या साहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविले. जालना तालुक्यातील सेवली मंडळात रविवारी रात्री सुमारे ६५ मि.मी. पाऊस पडला. जालना शहरातील रस्ते काही काळ पाण्यात गेले होते. जिल्ह्यातील जालना, अंबड आणि बदनापूर या तीन तालुक्यांतील दहा महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. या पावसाने जालना शहरात कुंडलिका नदीच्या पुलावरून पाणी वाहिले.
नगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा पुन्हा तडाखा
अहिल्यानगर: जिल्ह्याच्या दक्षिण भागाला पावसाने पुन्हा झोडपून काढले. २४ मंडलांत अतिवृष्टी झाली. पाथर्डीत चोवीस तासांत ६.१ इंच (१५५ मिमी) पाऊस झाला. नगर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत तालुके पुन्हा जलमय झाले आहेत. शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुरात अडकलेल्या २२७ नागरिकांची सुटका करण्यात आली. पुराचे पाणी लगतच्या वसाहतीत घुसून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. घर पडून ३ जण जखमी झाले.
जळगावमध्ये वाहून गेल्याने एकाचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा, एरंडोल तालुक्यांत रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील एका शेतकऱ्याचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. नद्यांच्या पुराचे पाणी पाचोरा शहरासह काही गावांमध्ये शिरल्याने घरांचे तसेच पिकांचे नुकसान झाले.
सोलापूरात पिकांचे नुकसान
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर, अक्कलकोट या ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी नदी नाले, ओढे भरून वाहू लागल्याने पाणी शेतात, रस्त्यावरून वाहत आहे. यामध्ये माढा तालुक्याला पुराचे संकट आहे. या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.