औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शुक्रवारी ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५७ जणांना दाखल करून घेण्यात आले. त्यांचे लाळेचे नमुने आज घेण्यात आले तर १३ जणांनी घरातच स्वत:च्या कुटुंबीयांपासून विलगीकरण करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी टाळेबंदीची अंमलबजावणी अधिक कडक केली आहे. त्यामुळे रस्ते सुनसान होते. तसेच करोनाच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन दुप्पट करावे, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.
दिल्ली येथील निजामुद्दीनमध्ये मरकजला जाऊन हरियाणा व सोनपेठ मार्गे परतलेल्या २८७ जणांपैकी २८५ जणांचा प्रशासनाने शोध घेतला असून त्यांचे विलगीकरण व तपासण्या केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. या शिवाय ७२ व्यक्ती दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानसह विविध प्रांतातील आहेत.
स्थलांतरित मजुरांसाठी मराठवाडय़ात २१६ शिबिरे सुरू असून त्यामध्ये २० हजार ५३४ जणांची सोय करण्यात आली आहे. या मजुरांना दोन वेळा चहा व नाष्टा दिला जात आहे. मराठवाडय़ातील ११३ शिवभोजन केंद्रातून पाच रुपये प्रतिथाळी प्रमाणे १३ हजार ०७५ जणांना जेवण दिले जात आहे. मराठवाडय़ात रास्त भाव दुकानांमध्ये पुरेसा धान्यसाठा उपलब्ध असून ३९ हजार ८५६ मेट्रिक टन धान्य उपलब्ध असून धान्याचे वाटपही केले जात आहे. मात्र, धान्य वाटप करताना दोन व्यक्तींमधील अंतराचे बंधन पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. ताप आल्यास स्वतंत्र रुग्णालयात तपासणी केली जाणार आहे. औरंगाबाद शहरातील किलेअर्क भगातील समाजकल्याण वसतिगृहात तसेच एमजीएमच्या क्रीडा मैदानात, एमआयटीच्या वसतिगृहात, धूत रुग्णालयात, एमएमएच्या हॉलमध्ये अशा विविध १२ ठिकाणी ही सोय आहे. त्याच बरोबर सौम्य सर्दीची लक्षणे असल्यास करोना तपासणी केंद्र सुरू केली जाणार आहेत. या केंद्रामध्ये ५१० खाटांची सोय केली जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील अंत्यत निकडीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या औषधी आणि खाद्य पदार्थ उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपैकी ३३८ कंपन्यांमध्ये काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, औद्यागिक सुरक्षा व पोलीस आयुक्तांच्या प्रतिनिधींसमवेत घेण्यात आलेल्या निर्णयानंतर कमी मनुष्यबळात काम करताना करोनाची लागण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.