छत्रपती संभाजीनगर – हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याची चित्रफित फिरल्यानंतर आणि त्याची राज्यभर चर्चा झाली. अखेर या प्रकरणी गुरुवारी रात्री साडेदहानंतर दौलताबाद पोलीस ठाण्यात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे काम मेघा इंजीनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस देण्यात आले होते. त्यामुळे कंत्राटदार सत्यनारायण यांनी बेजबाबदारपणा दाखवल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दौलताबाद पोलीस ठाण्यातील अंमलदार योगेश पंडितराव सूर्यवंशी यांनी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत कंपनीने इपॉक्सी ग्राऊटिंगचे काम सुरू असताना चांगल्या दर्जाचे बॅरिकेट्स लावणे तसेच रिफ्लेक्टरही लावणे आवश्यक होते. मात्र त्यासंदर्भात कंपनीने बेजबाबदारपणा दाखवल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाच्या माळीवाडा परिसरामध्ये बुधवारी सकाळी काही भागांमध्ये खिळे ठोकण्यात आल्याची एक चित्रपट समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली व रस्ते विकास महामंडळ व महामार्ग पोलीस व छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाची यंत्रणा खळबळून जागी झाली.
मात्र संबंधित प्रकार हा खिळे ठोकण्याचा नसून रस्त्याच्या अंतर्गत भेगा, तडे बुजवण्याच्या कामानिमित्त नोजल्सद्वारे रसायन सोडण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. परंतु चित्रफितीच्या प्रकारामुळे महामार्गावरील प्रवासाबाबत गैरसमज आणि लुटमारीविषयीची अनामिक भीती निर्माण झाल्याचा संदेश पसरला गेला. त्यात तीन वाहने संबंधित नोझल्स ठोकलेल्या ठिकाणावरून धावल्याने पंक्चर झाली. ही तीन वाहने पंक्चर होण्यामागे कंपनीचा बेजबाबदारपणा असल्याचाही ठपका तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.