छत्रपती संभाजीनगर : स्वत:ची आई कर्करोगाचा आजार जडून मृत्यू पावल्यानंतर या आजाराशी झुंजणाऱ्या अन्य रुग्णांचे मनोबल उंचावून त्यांना प्रसंगी औषधोपचार, पौष्टिक आहार, रोख स्वरुपात आणि दिवाळीसारख्या सणाला त्यांच्यासाठी पदरमोड करून एखाद्या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यातून एक अवलिया स्वत:चा आनंद शोधण्यात गुंतला आहे. मागील दहा वर्षांमध्ये लहान मुलांसह तीन हजारांपेक्षा अधिक कर्करोगग्रस्त रुग्णांना मदतीसाठी हात पुढे करण्यासह याच कामाला व्यापक करण्यासाठी उर्वरीत आयुष्य घालवण्याचा निश्चियही अवलिया सतीश अनंतराव महाजन यांनी केलेला आहे.

जेमतेम एका कुरिअरमध्ये व्यवस्थापन विभागातील पदावर असलेल्या सतीश महाजन यांनी कर्करोगग्रस्तांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत उभी करून देण्यासाठी ‘सी-फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली. त्यांच्या कुरिअर संस्थेने सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत उभी करण्यासाठी जागतिक स्तरावरील एक स्पर्धा घेतली. जर्मनीतून स्पर्धेचे संचलन झाले. या स्पर्धेतून साडेतीन लाखांचे पारितोषिक महाजन यांना मिळाले. या रकमेचा विनियोगही त्यांनी कर्करोगग्रस्तांसाठीच सुरू केला. नोकरीतील महिन्याकाठच्या वेतनातील काही रक्कमही खास कर्करोगग्रस्त रुग्णांना केमो आणि रेडिशनमध्ये आवश्यक पौष्टिक आहार पुरवण्यासाठी उपयोगात आणली जाते.

साधारणपणे नाचणी, आळीव, खारीक भुकटी, कडीपत्त्याचे रोपटे दिले जाते. हे रोपटे देण्यामागचा उद्देश पानांची भुकटी इतर पदार्थांमध्ये मिसळून खाल्ली तर रुग्णांच्या तोंडाला चव येते. यासह ठोक औषध विक्रेत्यांकडून ना नफा, ना तोटा या तत्त्वावर औषधे मिळवून ती उपचाराचा आर्थिक भार सोसू न शकणाऱ्या रुग्णांना दिले जातात. याशिवाय जीवनसत्त्व-डी, कॅल्डी, कॅल्शिअय सप्लिमेंटसारखी औषधेही डाॅक्टरांच्या सल्ल्याने रुग्णांना दिले जातात. या कामासाठी अनेक मान्यवरांचेही सहकार्य लाभते. त्यात डाॅ. अरविंद गायकवाड, डाॅ. उन्मेष टाकळकर, डाॅ. आशुतोष तोंडारे, रचिता बाहेती, डाॅ. चंद्रशेखर ताम्हण आदींसह ठोक औषध विक्रेत्यांचाही समावेश आहे, असे महाजन सांगतात.

बालरोग केमो विभागात संगीतोपचार महाजन यांनी सांगितले की, शासकीय कर्करोग रुग्णालयात लहान मुलांना केमो देण्यासाठी डाॅक्टरांना बरीच कसरत करावी लागते. मुलांचे मन उपचारासाठी वळवण्यासाठी एक सांगीतिक यंत्रणा देण्यात आलेली आहे. त्यामधून बालगीते, मुले रमून उपचार घेऊ शकतील, असे मनोरंजनात्मक जे-जे आहे त्याची व्यवस्था केलेली आहे.

सी-फाउंडेशनला शासकीय कर्करोग रुग्णालयाकडून आतापर्यंत दहा प्रशस्तीपत्र मिळाले आहेत. रुग्ण खचू नये, या उद्देशातून काम सुरू आहे. दिवाळीनिमित्त कर्करुग्णांसाठी एक सांगीतिक मैफलही आयोजली आहे. मंगळवारी धूत रुग्णालयात ही मैफल होत आहे. प्रत्येक सणाला रुग्णांना काही ना काही भेट, पौष्टिक आहाराचे वाटप केले जाते. – सतीश महाजन