छत्रपती संभाजीनगर : जायकवाडीतील नाथसागराचे अध्वर्यू मानले गेलेले पैठणचे भूमिपुत्र आणि नांदेड ही कर्मभूमी म्हणून ओळख असलेले देशाचे दिवंगत माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा पैठण शहरातील पूर्णाकृती पुतळा दुरवस्थेच्या गर्तेत सापडला आहे. एकीकडे नांदेडमधील शारदा भवन शिक्षण संस्थेच्या आवारातील शंकररावांच्या पुतळ्याची निगुतीने काळजी घेतली जात असल्याचे तर दुसरीकडे पैठणमध्ये मात्र शंकररावांचा पुतळा जन्मभूमीतच दुर्लक्षित झाल्याचे चित्र सोमवारी (१४ जुलै) त्यांच्या जयंतीदिनी समोर आले.

पैठणमधील स्थानिक सामाजिक क्षेत्रात काम करणारे काही ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते ज्ञानेश्वर उद्यानाच्या फाटक क्रमांक १ परिसरातील शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी एकत्र आले होते. त्यावेळी तेथे साफसफाई झालेली नव्हती, कचराही अस्ताव्यस्त पडलेला होता. मुख्य म्हणजे पुतळ्याच्या चबुतऱ्याची दर्शनीय भागातील ग्रेनाईटची फरशीही निखळलेली होती, असे चित्र असल्याचा आरोप अभिवादन कार्यक्रमादरम्यान अनेकांनी केला.

पैठणमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात शंकररावांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीचे काम सुरू झाले. परंतु, ते काम पूर्ण झाले तेव्हा राज्यात महायुतीचे सरकार आले. २०१६ साली तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि तत्कालीन काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे लोकार्पण झाले होते.

शंकररावांच्या पुतळा परिसराची दुरवस्था पाहवत नाही. जयंतीदिनी कार्यकर्त्यांना साफसफाई करावी लागली. फरशा निखळलेल्या आहेत. हिरवळ, फुलांची झाडे किंवा तत्सम सुशोभिकरणाचे काम तेथे नाही. पुतळ्यासाठी आपण आग्रही होतो आणि मंजुरी मिळवताना अनेक अडचणीतून जावे लागले. पाण्यासाठी तर झगडावेच लागते, परंतु शंकररावांच्या पुतळा परिसराच्या स्वच्छतेसाठीही लढावे लागणार की काय, अशी परिस्थिती आहे. अशोकराव चव्हाण आता सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, किमान त्यांनी तरी लक्ष द्यावे. – अनिल पटेल, माजी राज्यमंत्री.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शंकरराव चव्हाण यांच्या पुतळा परिसराच्या साफसफाईचे काम पैठणच्या खुल्या कारागृहातील बंदिवानांकडे आहे. उद्यानाचीही साफसफाई ते करतात. दररोज पुतळा परिसराची साफसफाई केली जाते. परंतु, मागील आठवड्यातील पावसामुळे चबुतऱ्याची फरशी निखळली आहे. ती लवकरच बसवण्यात येईल. – तुषार विसपुते, उद्यान उपअभियंता.