सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार विरोधाची मोट बांधून मराठवाडय़ात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी संघटनबांधणी केली. आता ही जागा मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे घेत आहेत. औरंगाबादेतील ताकद असलेल्या शिवसेना किंवा एमआयएमच्या विरोधात ब्र देखील त्यांनी उच्चारला नाही. केवळ पवार विरोध या भोवतालीच ठाकरे यांचे भाषण झाले.

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी जमविण्यात मराठवाडय़ातील मनसेच्या कार्यकर्त्यांना यश आले. बीड जिल्ह्यातून तर अगदी राज्य परिवहन मंडळाच्या बस करून कार्यकर्ते आणले गेले होते. सभेत ‘जय श्रीराम’च्या घोषणा, हनुमानाच्या वेषातील कार्यकर्ते, प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी या वातावरणात शिवरायांचा जयजयकार सुरू होता. तेव्हा मिशिदीवरील भोंगे व शरद पवार यांच्यावर टीका असा राज ठाकरे यांच्या भाषणाचे स्वरूप होते.  ते आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महारांजाचा उल्लेख करत नाहीत, ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर पवार आता बोलू लागले आहेत, असे  निरीक्षण नोंदवत त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जाती- पातीचे राजकारण वाढल्याचा आरोप पुन्हा एकदा केला. जेम्स लेन यांची टाइम पाक्षिकात घेतलेल्या मुलाखतीमधील प्रश्न व उत्तरे याचे दृकश्राव्य पद्धतीने केलेले सादरीकरण व त्यातील मुद्दे यावरून पवार यांच्यावर टीका केली.

रामदासांनी छत्रपतींविषयी लिहिलेला मजकूर अतिशय उत्कृष्ट होता. पण म्हणून ते गुरू होते की नाही अशी चर्चा पेरत रामदासांना ब्राह्मण ठरवणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जाणीवपूर्वक जातीचे विष पेरल्याचा पवारांवरील आरोप असो किंवा पवार हे सोयीचे तेवढे सांगतात, हा आरोप असेल. राज ठाकरे यांच्या टीकेचे लक्ष्य राष्ट्रवादी कॉग्रेसच असल्याचे  औरंगाबादच्या सभेतही दिसून आले. महाविकास आघाडी सरकारच्या केंद्रस्थानी शरद पवार असल्यानेही त्यांच्यावर आरोप करणे ही रणनीती असू शकेल, अशी चर्चा आता राजकीय गोटात केली जात आहे.

पवारविरोधी पोकळीचा फायदा होईल का ?

शिवसेना व राष्ट्रवादींच्या उमेदवारांमध्ये  सरळ लढत झाली त्या मतदारसंघातील नाराजी मनसेकडे वळविण्यासाठी लागणारी वातावरण निर्मिती या सभेतून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येते. लोकसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारची रचना बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत अधिक ताकदीने वापरली जाऊ शकेल. पवारविरोधी वातावरण निर्माण करताना भाजपने २०१४ नंतर स्वीकारलेले बोटचेपे धोरण व त्यातून निर्माण झालेल्या पोकळीत  मनसेला जागा मिळू शकेल अशी रणनीती आखली जात असल्याचे  दिसून येत आहे.

तरुणांची उपस्थिती

मनसेच्या औरंगाबाद येथील सभेतील गर्दीचा सर्वसाधारण वयोगट तिशी किंवा ३५ वयोगटातील होता. महिलांची संख्या लक्षणीय होती. मात्र, तरुणांचा सहभाग कमालीचा होता. सभेची सुरुवात ब्रह्मवृंदाच्या शंखनादाने करण्यात आली होती. मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली. पण भोग्यांचा मुद्दा आल्यानंतर टाळया, शिट्टयांचे आवाज सभेचा वयोगट सांगणारा होता.