औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या या निवडणुकीत शिवसेना-भाजपचा वरचष्मा आहे. शिवसेनेकडे १४१ तर भाजपकडे १८० सदस्य आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची सदस्य संख्या २५० आहे. सदस्य संख्येचे हे गणित आणि विधान परिषदेच्या निवडणुकीची पाश्र्वभूमी लक्षात घेता अर्ज भरताना दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समोरासमोर आले. तेव्हा दानवे यांनी कुलकर्णी यांना शिवसेनेच्या पद्धतीने नमस्कार केला. तेव्हा कुलकर्णी म्हणाले, ‘दानवेसाहेब, मायक्रो-मायनोरिटीमध्ये आहे. पुढे जाऊ द्या.’ दानवे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारालाच समर्थन मागितल्यामुळे ‘खेळीमेळी’ची ही निवडणूक कशी रंगते याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात नगरसेवक आणि जि. प. सदस्य मतदान करतात. या दोन्ही जिल्ह्य़ांत ६५७ पात्र उमेदवार असल्याची यादी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आली. एका नगरसेवकास मतदार यादीत ठेवायचे की नाही यावरून संभ्रम होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जि. प. सदस्य भागवत उफाड यांचाही मतदार यादीत समावेश करण्यात आला. एमआयएमचे २८ नगरसेवक असून आमदार अब्दुल सत्तार यांचे ३६ समर्थक आहेत. काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतर जि. प.तील सत्तार यांचे समर्थक या निवडणुकीत कोणाला मदत करतात, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विकास आघाडीचेही काही सदस्य असल्यामुळे कोणाच्या पारडय़ात कोणाची मते पडतात, याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार, किशनचंद तनवाणी, सुभाष झांबड अशी मातबर मंडळी उमेदवार म्हणून उभी होती. या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना बाबुराव कुलकर्णी यांच्या पाठीशी मतदान वळावे म्हणून खासे प्रयत्न करावे लागणार आहे.
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नंदकिशोर विठ्ठल सहारे यांनीही अर्ज दाखल केला आहे. ते सत्तार यांचे समर्थक आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी मतदारांची गोळाबेरीज युतीच्या बाजूने अधिक आहे. ती टिकवून ठेवणार आहोत, असा संदेश देण्यासाठी दानवे यांचा अर्ज दाखल करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, भाजपचे डॉ. भागवत कराड, किशनचंद तनवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर काँग्रेसची बहुतांश नेतेमंडळी बाबुराव कुलकर्णी यांच्यासमवेत अर्ज दाखल करण्यास आले होते.