औरंगाबाद: मशिदीवरील भोंगे प्रकरणातील पुढचा टप्पा म्हणून राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेत हिंदू जननायक अशी प्रतिमा निर्माण करत सभा घेतल्यानंतर औरंगाबादच्या राजकारणाला मिळालेल्या राजकीय वळणावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी सभा होणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

सत्तेत प्रमूख पदी असणाऱ्या शिवसेनेची ताकद दाखविण्याच्या उद्देशाने तसेच संघटन बांधणीचा भाग म्हणून गेल्या १५ दिवसात १५०० हून अधिक बैठका घेण्यात आल्या असून पहाटे क्रीडांगणापासून ते भाजी बाजारातही सभेला येण्याची पत्रके वाटण्यात आली आहेत. त्यामुळे या सभेला एक लाख मतदार औरंगाबाद शहरातून उपस्थित राहतील असा दावा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान मराठवाडय़ातील शिवसेना नेत्यांच्या बैठका माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतल्या आहेत. संघटनात्मक पातळीवर शिवसेनेची ताकद सभेतून दाखविण्याचा बुधवारी प्रयत्न होणार आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी शिवसेनेकडून हिंदूत्वाऐवजी विकासावर भाष्य करावे असे प्रयत्न सुरू असून त्यामुळे एमआयएम व भाजपकडून पाणी प्रश्न अधिक आक्रमकपणे पुढे मांडण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात औरंगाबाद शहरातील वातावरणामुळे ध्रुवीकरण व्हावे असे प्रयत्न आवर्जून केले जात आहेत. एमआयएमचे नेते नुकतेच औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक झाले. ही कृती करताना औरंगाबादचे खासदार इत्मियाज जलील यांनी भगवा फेटा बांधला होता. त्यामुळे त्यांची ही कृतीही ध्रुवीकरणाचाच भाग होती, असे दिसून आल्यानंतर शिवसेनेकडूनही राजकीय प्रतिक्रिया उमटेल असे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘ मुखी राम आणि हाती काम, हेच हिंदूत्व’ असे घोषवाक्य असणारे फलक औरंगाबाद शहरात लावण्यात आले आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमी दिला जाणारा संदेश राज्यभर जाणारा असल्याने बुधवारच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

एमआयएमची शिवसेनेला अडचणीत आणण्याची खेळी सभेच्या निमित्ताने डाव व प्रतिडावही आता सुरू आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत एमआयएमच्या दोन सदस्यांनी मतदान करण्यासाठी महाविकास आघाडीने जाहीर मदत मागितली तर ती देण्याबाबत सकारात्मक विचार करू असे असदोद्दीन ओवेसी यांनी नांदेड येथे जाहीर केले आहे. असे करुन त्यांनी शिवसेनेची पुन्हा कळ काढली आहे. मदतीची जाहीर विनंती केली तर शिवसेनेची हिंदूत्वाची भूमिका फारशी कणखर नाही, असा संदेश जाईल. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यावरुन वाद घडावेत अशी खेळी एमआयएमकडून करण्यात आली असल्याने बुधवारच्या सभेत यावर मुख्यमंत्री कोणती भूमिका जाहीर करतात, याचेही औत्सुकही वाढले आहे.

दरम्यान औरंगाबाद शहराच्या पाणीप्रश्नी काहीशी मागच्या बाकावर येणारी शिवसेना कोणती भूमिका घेते., सत्तेत असताना कोणत्या उपाययोजना केल्या जातील, पाणी पुरवठा योजनांची गती वाढविण्यासाठी काय केले जाईल याचीही उत्सुकता औरंगाबादकरांमध्ये आहे. दरम्यान मराठवाडय़ातील शिवसेनेची संघटानामतक ताकद वाढविण्यासाठीही या सभेचा उपायोग होईल काय, याची विरोधकांकडून चाचपणी सुरू आहे. महापालिका निवडणुकांमध्ये गेल्यावेळी शिवसेनची ताकद काहीशी घटली होती. आता पाणी प्रश्नावरुन घेरत विरोधक आक्रमक झाल्याने बुधवारच्या सभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची उत्सुकता वाढली आहे.

दीड हजारांवर पोलीस तैनात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बुधवारी येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात राहणार आहे. सभेच्या परिसरात १७ सीसीटिव्हीद्वारेही नजर ठेवली जाणार आहे. पाच पोलीस उपायुक्त, ६ सहायक पोलीस आयुक्त, २०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह एक हजार पोलीस कर्मचारी व ४०० गृहरक्षकदलाचे जवान तैनात केले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली. तसेच शहराचा वाढता विस्तार पाहता अतिरिक्त दोन पोलीस उपायुक्त पदांचा प्रस्तावही पाठवण्यात आलेला आहे. सभेसाठी बाहेरगावहून येणाऱ्या वाहनांसाठी कर्णपुरा मंदिर परिसरातील मैदान, विवेकानंद लॉ कॉलेज, एमपी लॉ कॉलेजच्या परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आल्याचेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.