महाविकास आघाडी सरकार हे पाणी विरोधी सरकार आहे. त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड गुंडाळली, कोकणातून मराठवाड्याला पाणी देणाऱ्या योजनेचा शासन निर्णय रद्द केला. औरंगाबादसारख्या शहरला पाणी देता आलेले नाही, त्यामुळे हे सरकार पाणी विरोधी सरकार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. औरंगाबाद येथे जलआक्रोश मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केले. या वेळी बोलताना त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केले. केवळ मुंबई व उपनगरीय भागा पलीकडे त्यांना महाराष्ट्र माहीत नसल्याचेही ते म्हणाले. याच जलआक्रोश मोर्चावरुन आता शिवसेनेनं देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर निशाणा साधलाय.

जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलन करत असताना
“जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यावरून भडकेल असा अंदाज आहे व त्यात औरंगाबादसारखी शहरेही मागे राहणार नाहीत. लोकशाहीत जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करणे, मोर्चे काढणे यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. जरूर तेव्हा शिवसेनेनेही आंदोलनांचे हे हत्यार प्रभावीपणे वापरले आहेच. किंबहुना इतर कुठल्याही पक्ष-संघटनांपेक्षा अशा जनआंदोलनाचा दांडगा अनुभव शिवसेनेच्या गाठीशी अंमळ अधिकच आहे. मात्र जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलन करत असताना त्यामागील भूमिका व हेतूही तेवढाच शुद्ध असायला हवा. पण औरंगाबादमध्ये निघालेल्या मोर्चाबद्दल असे म्हणता येईल काय?,” असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारलंय.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
abdul karim tunda acquitted in 1993 serial blasts case
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष मुक्त
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
rohit pawar slams ram kadam ashish shelar
“सभागृहात अ‍ॅक्टिंग कशाला करताय? होय, आहे योगेश सावंत आमचा कार्यकर्ता”, रोहित पवारांचा राम कदमांवर हल्लाबोल!

१६८० कोटींच्या या योजनेला सुरुवात
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जलआक्रोश मोर्चामागे खरोखरच जनहिताचा शुद्ध भाव होता की हा मोर्चा अशुद्ध व गढूळ झालेल्या राजकारणाचाच भाग होता, या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर भारतीय जनता पक्षाने दिले पाहिजे. अर्थात महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने प्रांजळपणा केव्हाच खुंटीवर बांधून ठेवला असल्याने ‘जलआक्रोशा’मागील सत्य त्यांच्या मुखातून बाहेर येणे शक्य नाही. वास्तविक औरंगाबादच्या पाणी प्रश्नात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच गांभीर्याने लक्ष घातले आहे आणि औरंगाबादवासीयांना दररोज २४ तास आणि भरघोस पाणी देणाऱ्या योजनेचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. १६८० कोटींच्या या योजनेअंतर्गत पैठणचे जायकवाडी धरण ते संभाजीनगर शहरापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे कामही सुरू होत आहे. ही योजना कार्यान्वित होईपर्यंत औरंगाबादच्या नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडणार हे कोणीच नाकारत नाही. पण हे काम संपेपर्यंत निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कोणी राजकीय दळण दळणार असेल तर ते त्यांना लखलाभ,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधलाय.

केवळ या योजनेचे श्रेय शिवसेनेला मिळेल या पोटदुखीतून…
“मुळात औरंगाबादमधील जलआक्रोश मोर्चामागे भारतीय जनता पक्षाचे राजकारण तर आहेच पण जनतेची दिशाभूल करणे हा दुसरा डाव आहे. औरंगाबादमधील पाणी प्रश्न एका रात्रीतून जन्माला आला नाही. औरंगाबादला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्णशीर्ण झाली आणि ती बदलणे आवश्यक आहे. ती वेळेत का बदलली गेली नाही आणि या कामात अडथळे कोणी आणले हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. केंद्रात यूपीएचे सरकार असताना शिवसेनेच्या पुढाकाराने समांतर जलवाहिनीची योजना अस्तित्वात आली होती. जनतेला किफायतशीर ठरेल आणि नियमित पाणीही मिळेल अशा पद्धतीने ती योजना राबवली गेली असती तर आज औरंगाबादमधील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध झाले असते. मात्र केवळ या योजनेचे श्रेय शिवसेनेला मिळेल या पोटदुखीतून ही योजनाच बंद पाडली गेली,” असा दावा शिवसेनेनं केलाय.

आनंद उत्सव व्हावा असेच वातावरण होते
“भारतीय जनता पक्ष हा एक गमतीशीर प्राणी आहे. कोणत्या गोष्टीचा ‘इव्हेंट’ करतील याचा भरवसा नाही. लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करणे हा तर विरोधी पक्षाचा हक्कच आहे, पण हल्ली भाजपावाले आंदोलनांच्या नावाखाली इव्हेंटच जास्त करीत असतात. भाजपाने औरंगाबादमध्ये आधी औरंगजेबाच्या थडग्याचा इव्हेंट केला. तो संपला नाही तोच, पाण्याच्या प्रश्नावर ‘जलआक्रोश’ मोर्चाचे आयोजन केले. जलआक्रोश मोर्चात लोकांची पाण्यासाठी सुरू असलेली तडफड दिसणे अपेक्षित होते. पण इथे एखादी भव्य शोभायात्रा निघावी व आनंद उत्सव व्हावा असेच वातावरण होते. सजवलेल्या उंट-घोड्यांवरून शेळ्या-मेंढ्या हाकण्याचे काम सुरू होते,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

जलआक्रोश मोर्चा हा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी होता की…
“भाजपापुरस्कृत महिला नटून-सजून हातात घागरी घेऊन फुगड्या वगैरेचा ‘जलआक्रोश’ करीत होत्या. रिकाम्या घागरींचे नेपथ्यही चांगलेच होते. औरंगाबादची जनता या मोर्चात सामील झाली नाही. देवेंद्र फडणवीस वगैरे नेते उतरले. भागवत कराड, रावसाहेब दानवे हे दोन केंद्रीय मंत्री भिजलेल्या गळ्याने मोर्चात उतरले, पण जलआक्रोश मोर्चा हा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी होता की पाण्याचे राजकारण करण्यासाठी होता?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.

कराड यांनी तर या शहराचे महापौरपद भूषविले आहे, तरीही आक्रोश करीत ते…
“बरं, औरंगाबाद महापालिकेतील २५-३० वर्षांच्या सत्ताकाळात शिवसेनेबरोबर भाजपाही युतीमध्ये सत्तेचा वाटेकरी होताच. शिवसेनेच्या सोबतीने भाजपाचेही अनेक महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष झालेच. मग औरंगाबादमध्ये आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असल्यामुळे जो रोष निर्माण झाला आहे त्याला भारतीय जनता पक्षही जबाबदार नाही काय? पण तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीत यावरून प्रश्न विचारले जाऊ नयेत आणि आपणच कसे जनतेसोबत आहोत अशी धूळफेक करण्यासाठी जलआक्रोश मोर्चाचा हा घाट घालण्यात आला. आता केंद्रात मंत्री असलेले डॉ. भागवत कराड यांनी तर या शहराचे महापौरपद भूषविले आहे, तरीही आक्रोश करीत ते या मोर्चात सहभागी झाले हा मोठाच विनोद म्हणायला हवा,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.

आशिया खंडातील या सर्वात मोठया योजनेचे काम संपले की…
“मुळात अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच पाणी हीदेखील माणसाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे केवळ औरंगाबादच काय देशाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडेच पिण्याचे शुद्ध पाणी मुबलक व नियमित मिळायला हवे. पण सगळीकडेच ते मिळते काय? राज्य सरकारने औरंगाबादला दिलेल्या १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम आता वेगात सुरू आहे. आशिया खंडातील या सर्वात मोठया योजनेचे काम संपले की औरंगाबादला २४ तास पाणीपुरवठा सुरू होईल. औरंगाबादच्या पाण्यासाठी मुख्यमंत्री डोळ्यांत तेल घालून लक्ष देत असताना त्यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांच्या डोळ्यांतून ‘जलआक्रोश’ तर होणारच! औरंगाबादमध्ये भाजपाने केलेला उंटावरचा ‘जलआक्रोश’ त्यापेक्षा वेगळा कुठे आहे?,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.