छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बीड शहरातील तीन परीक्षा केंद्राना अचानक दिलेल्या भेटीत ३६ कॉपीबहादर आढळले असून, त्यांचा ‘संपूर्ण परफॉर्मन्स रद्द’ (डब्ल्यूपीसी) करण्याचे आदेश कुलगुरू यांनी दिले आहेत.

बीड शहरातील बलभीम महाविद्यालय, केएसके महाविद्यालय व आदित्य व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय अशा तीन ठिकाणी सकाळच्या सत्रात भेट दिली. या तीनही ठिकाणी अनुक्रमे १५, १५ व सहा असे ३६ काॅपी बहाद्दर विद्यार्थी आढळून आले. या विद्यार्थ्यांचा उत्तरपत्रिका घेण्यात आली. भरारी पथकातील डॉ. सतीश दांडगे व डॉ. भास्कर साठे हेही उपस्थित होते.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी बलभीम महाविद्यालयात ४२८, केएसके महाविद्यालयात १७८ तर आदित्य व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात ३३७ असे १ हजार ३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या परीक्षा केंद्रांवर अनेक त्रुटी आढळून आल्या. केंद्रावर विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे व्यवस्था करण्यात आल्याचे आढळले नाही. तसेच तीनही ठिकाणी विद्यार्थी सर्वात वरच्या मजल्यावर बसविण्यात आले. स्टाँग रुममध्ये सीसीटीव्ही, झेरॉक्स मशीन नसल्याचे दिसून आले. याबद्दल मा. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी संबंधित केंद्र प्रमुखाला विचारणा केली. या भेटीच्या वेळेपर्यंत केएसके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर तसेच सहकेंद्र प्रमुख हे महाविद्यालयात आले नव्हते. तर बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष उंदरे, केंद्रप्रमुख व सहकेंद्रप्रमुख उपस्थित होते. तर आदित्य व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे संपूर्ण केंद्रच विस्कळीत होते, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

विद्यापीठांतर्गत चार जिल्ह्यांतील ८० केंद्रांवर सुमारे ३० हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सर्व अभ्यासक्रमांचे २९ हजार ९६९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी चार जिल्ह्यांत मिळून ३२ परीक्षा केंद्र आहेत. तर ३२ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.