छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने सुरु केलेल्या नोंदणीच्या विरोधात आक्षेप घेतल्याने दोन युवकांवर दाखल झालेल्या गुन्हाच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील क्रांती चौकापासून मोर्चा काढण्यात आला. आरएसएस कार्यालयावरचा हा पहिला मोर्चा असल्याचा दावा वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला.

शैक्षणीक संकुलात वैचारीक संघटनांची नोंंदणी कशासाठी जर असे असेल तर संघाच्या नोंदणी प्रमाणपत्र दाखवा असे आव्हान त्यांनी दिले. या वेळी क्रांती चौकापासून ‘ आरएसएस’ मुर्दाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणला.

शहरातील देवगिरी महावद्यालयासह विविध ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले होते. यातील एका महाविद्यालयासमाेरील सदस्यता नाेंदणीला विरोध करण्यात आला. राहुल मकासरे आणि विजय वाहुळ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. समाजमाध्यमांमधून तो व्यक्त केला जात असताना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रा. स्व. संघ कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कोणत्याही स्वरुपाची तक्रार नसताना पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल केली.

दुपारी बाराच्या दरम्यान सुजात आंबेडकर, सिद्धार्थ मोकळे, अमित भुईगळ आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये क्रांती चौकातून मोर्चास सुरूवात करण्यात आली. या वेळी रा. स्व. संघ संविधान विरोधी असून त्यांना तिरंगा आणि संविधान भेट देण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले. हा मोर्चा काही अंतरावर गेल्यानंतर जिल्ह्या बँकेच्या अलिकडे पोलिसांनी अडवला. या वेळी रा. स्व. संघाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मोर्चात सहभागी नेत्यांचे एक शिष्टमंडळ तिरंगा ध्वज, संविधानाची प्रत घेऊन रा. स्व. संघ कार्यालयापर्यंत गेले. शहरातील प्रल्हाद भवन या रा. स्व. संघाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने येथे कोणीही नसते असे शिष्टमंडळास पोलिसांनी सांगितल्याची माहिती सुजात आंबेडकर यांनी मोर्चाच्या समारोप प्रसंगी दिली. रा. स्व. संघाच्या विरोधात केवळ आंबेडकरी जनताच उभा राहू शकते, असा संदेश देशभरात नव्हे तर रा.स्व. संघाचे काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यकर्त्यांपर्यंत पोहचल्याचे सांगत मोर्चा यशस्वी झाल्याचा दावा या वेळी करण्यात आला.

‘ मनुवाद पसरायला नको म्हणून त्यांना नोंदणी करायला आम्ही नकार दिला होता. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा फलक काढायला भाग पाडले होते. नोंदणी करणाऱ्या या संघटनेची नोंदणी कुठे आहे, असा सवाल या वेळी करण्यात आला. तिरंगा आणि संविधानाची प्रत स्वीकारायला ‘ आरएसएस’ चा कोणी प्रतिनिधी पुढे आला नाही म्हणजे त्यांनी त्याचा अपमानच केला असल्याचा आरोप या वेळी सुजात आंबेडकर यांनी केला. या माेर्चामुळे शहरातील विविध चौकात शुक्रवारी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला.