छत्रपती संभाजीनगर – आमदार धनंजय मुंडे यांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) अडगळीत पडले असून, त्यांना कोणी किंमत देत नाही, अशी खोचक टिप्पणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आमदार धस यांनी आंतरवालीत जाऊन घेतलेल्या भेटीदरम्यान केली. त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे यांनी त्यांच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार माजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर मुंडे यांचे बीड जिल्ह्यातील विरोधक तथा भाजपचे आमदार सुरेश धस हे तातडीने जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवालीत दाखल झाले होते. मनोज जरांगे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्यासोबत स्वतंत्रपणे भेट घेऊन हत्येच्या कटाच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, जरांगे यांचे एक साथीदार गंगाधर काळकुटे यांनीही मुंडे यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगे व आपल्यामध्ये दरी पाडण्याचा डाव धनंजय मुंडे यांनी टाकला असून, आपल्याला २५ कोटी रुपये देण्याचा आणि विधान परिषदेवर घेण्याचा प्रस्ताव यापूर्वी दिल्याचा आरोप गंगाधर काळकुटे यांनी पत्रकार बैठक घेऊन केला आहे. काही संवाद ध्वनिफितही असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काळकुटे यांचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी “मित्र” केला होता. काळकुटे आपल्याला भेटत होते आणि आठ-आठ तास ते भेटीसाठी ताटकळत उभे असायचे, अशा आरोपांवर काळकुटेंनी पत्रकार बैठक घेऊन बाजू मांडली.
हत्येचा कट रचल्याच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी तातडीने पत्रकार बैठक घेऊन आपली आणि जरांगेंची नार्को चाचणी करण्यासह केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडून चौकशीची मागणी केली. त्यानंतर मनोज जरांगेंकडून मुंडे यांचे आव्हान स्वीकारून नार्को चाचणी करण्यासह तयार असल्याचा अर्ज पोलिसांकडे देण्यात आला.
या सर्व घडामोडीनंतर मनोज जरांगे यांची भेट घेणाऱ्या नेत्यांची आंतरवालीत गर्दी वाढत असून, शनिवारी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यानंतर धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. मुंडे यांना त्यांच्या पक्षातही किंमत राहिली नसून, त्यांना अडगळीत टाकण्यात आल्याची खोचक टीका धस यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर मुंडे ज्या आक्राळस्तपणे बोलले त्यामागचे अर्थही अनेकांना कळले असून, त्यांच्या बोलण्यातील खोटेपणा उघडकीस आला आहे, अशी टीकाही धस यांनी केली.
