छत्रपती संभाजीनगर – स्वाभिमानी शेतकरी संघटना, बच्चू कडू यांची प्रहार संघटना यांसह राज्यातील विखुरलेल्या काही शेतकरी संघटनांना एकत्र आणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक मोठे आंदोलन उभे करण्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या माहितीला ‘लोकसत्ता’शी बोलताना दुजोरा दिला आहे.

शेट्टी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पैठणमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गुरुवारी शेट्टी यांनी धाराशिवमधील भूम येथील उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उपोषणास बसलेले सतीश महाराज कदम यांची भेट घेतली. प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांनी अलीकडेच शरद जोशींच्या आंबेठाणला भेट दिल्याची माहिती असून, यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन लढा उभारण्याचा विचार पुढे आला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण व बच्चू कडू दोघेही सातत्याने संपर्कात आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या सर्व संघटना, नेत्यांनी एकत्रित येण्याची गरज आहे. यासाठी एकत्र येऊ शकणाऱ्या शक्य तेवढ्या संघटनांचा एकत्रित लढा उभारून दिवाळीनंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आम्ही आंदोलन उभारणार आहोत. – राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना