उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा

औरंगाबाद : औरंगाबाद येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांना प्राधान्य मिळेल असे प्रयत्न केले जात असून या संदर्भात टाटा समूहाचे तन्मय चक्रवर्ती आणि आफ्रिकेसह विविध देशांतील गुंतवणूकदार प्रकाश जैन यांच्यासमवेत ऑरिकमधील पायाभूत सुविधांची पाहणी केली असून त्यांनी गुंतवणुकीस अनुकूलता दाखवली असल्याची माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.  जिल्हा नियोजन समितीच्या बठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील माहिती तंत्रज्ञान विषयक धोरण अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक चांगले झाले आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांना केवळ व्यवसाय  सुलभता देऊन भागत नाही, तर जगण्यासाठी आवश्यक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. तसे प्रयत्न केले जातील, निवास आणि कामाचे संकुल एकच असावे, असे धोरण आहे. हिंजेवाडीसारख्या भागात या क्षेत्रातील मंडळींना वाहतूक कोंडीचा त्रास होतो आहे, तो लक्षात घेऊन धोरणांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मराठवाडय़ातील बेरोजगारीवर उपाययोजना करता यावी म्हणून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे देसाई यांनी सांगितले. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अन्नधान्य उद्योग प्रक्रियेसाठी बिडकीन येथे ५०० एकर जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे भूमिपूजन जून महिन्यात करणार असल्याचेही सुभाष देसाई म्हणाले. शेंद्रा, बिडकीन भागाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग तूर्त करता येणार नाही, असे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. याबाबतही आढावा घेण्यात येणार असून औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या निविदा एप्रिलमध्ये निघतील, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटनाची बैठक औरंगाबादेत

औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. अजिंठय़ाच्या रस्त्यासह विमानतळाची धावपट्टी वाढवणे, वेरूळ येथील लाइट अ‍ॅण्ड साउंडच्या मंजूर प्रकल्पात अधिक भर कशी घालता येईल यासह पर्यटनाच्या अनुषंगाने काय करावे याचा अहवाल मागवला होता. त्याबाबत मंगळवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून औरंगाबादच्या विकासासाठी त्यांनी दौरा करावा,  अशी विनंती करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.