छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग, विडा भागात पवन ऊर्जा प्रकल्प व रस्ते आदी इतर कामे होऊ द्यायची असतील तर दोन (२ कोटी) कोटी रुपये द्यावे लागतील, असे म्हणत पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदवण्यात आली. मंगळवारी सकाळी १०.३० ते दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत मस्साजोग ते भगवानगडाच्या परिसरातील खरवंडी गावाजवळील हॉटेलच्या दरम्यान बळजबरीने पिस्तुलाचा धाक दाखवून दुसऱ्या गाडीत बसवणे, खंडणी मागणे हा प्रकार सुरू होता, असे तक्रारीत नमूद असून त्यावरून बुधवारी दुपारी रमेश घुले व अनोळखी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नाशिकच्या अवादा कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील केदू शिंदे (वय ४२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार सुनील शिंदे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून बीडमधून कंपनीचे सहकारी आशुतोष सिंग, शांतनू कुमार व संजय शर्मा यांच्यासोबत मस्साजोगकडे प्रकल्पाच्या ठिकाणी जात होते. मस्साजोगच्या पथकर वसुलीच्या ठिकाणावरून पुढे जात असताना एम एच – १५ – ईबी – २६८२ या पांढऱ्या रंगाच्या वाहनातील व्यक्तींनी हात दाखवून शिंदे यांना त्यांचे वाहन थांबवण्यास भाग पाडले. त्यांना त्यांच्या वाहनातून उतरवून पांढऱ्या कारमध्ये धमकावून बसवायला लावले. नंतर अन्य सहकारी आशुतोष सिंग यांनाही आणून बसवले. रमेश घुले याने पिस्तुलचा धाक दाखवत, तुम्ही आम्हाला न विचारता येथे जमीन अधिग्रहण करून पवन ऊर्जाचा प्रकल्प कसा करता म्हणून वरिष्ठांशी संपर्क साधून द्यायला भाग पाडले. वरिष्ठ अधिकारी अल्ताफ तांबोळी यांच्याशी संपर्क साधून दिला. जमीन अधिग्रहणाचा व्यवहार सुधीर पोटे यांच्याशी असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून देण्यात आला. पोटे हे त्यावेळी पुण्यात होते. तेथून निघून भगवानगडाच्या दिशेने येऊन भेटण्याचे ठरले.

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण; गुन्हा दाखल

हेही वाचा – मागोवा : मतदानाच्या प्रारूपात जात आणि धर्म दोन्ही आघाडीवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घुले याने माजलगाव मार्गे भगवान गडाच्या दिशेने वाहन नेऊन खरवंडी गावाजवळ एका हॉटेलपुढे थांबवण्यात आले. तेथे रमेश घुलेने सुधीर पोटे यांना पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करायचे असेल तर दोन कोटी रुपये लागतील, असे सांगितले. दरम्यान तेथे पोलिसांचे वाहन आले व त्यांना पाहताच रमेश घुले व सोबतचे अनोळखी १२ जण पसार झाले, असे सुनील शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.