छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासूनच अतिवृष्टीचा जोर धरलेल्या मराठवाड्यात ३ हजार ५० गावे बाधित, तर ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दुष्काळी चित्र एकीकडे, तर दुसरीकडे शेतीसाठीच अधिक वापर होत असलेल्या ट्रॅक्टरच्या खरेदीत गतवर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यंदाच्या नवरात्रोत्सव काळात मराठवाड्यात तब्बल ५ ते ७ हजार ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. मोटारींच्या तुलनेमध्ये ट्रॅक्टरची खरेदी अधिक नोंदली गेली आहे.

राज्यात गतवर्षीच्या (२०२४-२५) सप्टेंबर महिन्यात १२ हजार २२ ट्रॅक्टरची विविध कंपन्यांकडून वितरकांनी खरेदी केलेली होती. तर, यंदाच्या (२०२५-२६) सप्टेंबर महिन्यात २० हजार ५१५ ट्रॅक्टरची खरेदी झाली होती. यातील ५ ते ७ हजार ट्रॅक्टरची मराठवाड्यातून खरेदी झाल्याचा अंदाज वितरकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर (२०२५) या दहा दिवसांत १ हजार ते अकराशे ट्रॅक्टरची विक्री झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी ३० टक्क्यांवर असल्याची माहिती ट्रॅक्टरचे येथील मुख्य वितरक मेघराज पाटील यांनी दिली.

यंदा वाहनखरेदीसाठी वस्तू व सेवाकर ५ टक्के झाला आहे. याशिवाय अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, ओबीसी आर्थिक विकास महामंडळ या संस्थांकडून मंजूर कर्ज संचिकांवर मिळणारी १२ टक्के व्याज परतावा, सवलत (सबसिडी) या कारणांचाही दुष्काळी परिस्थितीत ट्रॅक्टरविक्री अधिक वाढल्याचे सांगितले जात आहे. पाच एकरवरील शेतकऱ्यांना एक लाखाची, तर पाच एकरखालील अल्पभूधारक शेतकऱ्यांना सव्वालाखाची सवलत मिळते. महामंडळांकडून कर्ज घेणाऱ्यांना दोन लाखांपर्यंतची व्याजमाफी मिळते. ट्रॅक्टरमधील २० ते ७५ अश्वशक्ती (एचपी) क्षमतेच्या प्रकारातील ही विक्री आहे. यामध्ये २१ ते ३० एचपीला ३० टक्के, तर ४५ ते ५० एचपी ट्रॅक्टरची ५० टक्के विक्री झाल्याचे वितरकांकडून सांगण्यात आले.

मागील चार वर्षांपासून फेसलेस पद्धतीमुळे ९० टक्के ट्रॅक्टरची नोंदणी वितरकांकडेच असते. आधारकार्ड आदी कागदपत्रांवरील नाव किंवा अन्य काही कारणांच्या त्रुटींमुळे काही ट्रॅक्टरची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली जाते. – विजय कौठुळे,

प्रादेशिक परिवहन अधिकारी

यंदा नवरात्रोत्सव कालावधीत ट्रॅक्टरची विक्री हजारांवर झाली आहे. ती गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के अधिक आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्के अधिक विक्री होईल असे अपेक्षित होते. परंतु अतिवृष्टीत विहीर कोसळली, सोयाबीनचे नुकसान आदी कारणांमुळे अपेक्षेपेक्षा २० टक्के कमी विक्री झाली. मराठवाड्यात ५ ते ७ हजार ट्रॅक्टरची विक्री झाल्याचा अंदाज आहे.- मेघराज पाटील, मुख्य वितरक