छत्रपती संभाजीनगर : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास येत्या २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता घटस्थापनेने सुरुवात होणार आहे. नवरात्रापूर्वी देवीच्या मंचकी निद्रेस रविवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी प्रारंभ झाला आहे. सात दिवसांच्या निद्रेनंतर घटस्थापनेने नवरात्रास सुरुवात होणार आहे.

घटस्थापना ते अश्विन पौर्णिमा, असा १५ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारचा आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. नवरात्रोत्सवात दररोज रात्री छबिना मिरवणूक आणि अलंकार पूजा भाविकांसाठी पर्वणी असते. ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असून, मंदिराची पौर्णिमा ७ ऑक्टोबर रोजी आहे. कोजागिरी पौर्णिमेस राज्यातील विविध भागातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक चालत येतात.

भाविकांसाठी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने रस्त्यावर जागोजागी अन्नदान, वैद्यकीय उपचाराची सोय करण्यात येते. शहरात या महोत्सवाच्या निमित्ताने व्यापारी वर्गाची लगबग सुरू आहे. तसेच पुजारी वर्गातून व नागरिकांमधून घराची रंगरंगोटी साफसफाई सुरू आहे. मंदिर संस्थानासह नगरपरिषद, महावितरण, ग्रामीण रुग्णालय, एसटी महामंडळाने आढावा घेण्यास सुरुवात केलेली आहे. संस्थानच्या वतीने भाविकांसाठी अनेक विकासात्मक कामे सुरू आहेत.

नवरोत्रोत्सवातील कार्यक्रम

येत्या २२ सप्टेंबर रोजी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी घटस्थापना, रात्री छबिना मिरवणूक, २३ ते २५ नित्योपचार पूजा व रात्री छबिना, २६ रोजी ललिता पंचमी, दुपारी रथ अलंकार महापूजा, २७ रोजी मुरली अलंकार पूजा, २८ ला शेषशाही अलंकार पूजा, २९ रोजी भवानी तलवार अलंकार पूजा, ३० रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार पूजा, वैदिक होम, दुर्गाष्टमी, रात्री छबिना मिरवणूक, १ ऑक्टोबर रोजी महानवमी, दुपारी १२ वाजता होमावर धार्मिक विधीनंतर घटोत्थापन, रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक, २ ऑक्टोबरला विजयादशमी (दसरा), सार्वत्रिक सीमोल्लंघन, मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा, शमीपूजन, ६ रोजी कोजागिरी पौर्णिमा, ७ रोजी मंदिर पोर्णिमा, पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबिना मिरवणूक, ८ रोजी नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद व रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबिना मिरवणूक, याप्रमाणे धार्मिक विधी, महापूजा होणार आहेत.