१५ हजार भाविकांची अट काढण्यास प्रशासन तयार

औरंगाबाद : तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या आणि दर्शनासाठी प्रतिदिन पोलीस प्रशासनाने ठरवलेला १५ हजारांचा आकडा यामुळे चेंगराचेंगरी होऊ शकते, असे वरिष्ठ पातळीवर कळवण्यात आले आहे. ऑनलाइन पास असेल तरच दर्शन असा नियम पोलीस कडकपणे अंमलबजावणीत आणत असल्यानेही समस्या  होत असल्याचे तुळजाभवानी मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घटस्थापनेनंतर गुरुवारी चालत तुळजापुरी जगदंबेच्या दर्शनाला येणाऱ्या अनेकांना कळस दर्शन करून घाटशीळवरून परत जावे लागले. कोविड असल्याने गर्दी होणार नाही, पण दर्शन तरी घेऊ द्या, अशी विनंती मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली जात आहे. तुळजापुरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून हजारोंच्या संख्येने लोक येतात. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या असल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश देऊ नये असे आदेश असले, तरी लोक एवढ्या मोठ्या संख्येने येतात की त्या प्रत्येकाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करणे किंवा लस प्रमाणपत्र तपासणे अवघड काम आहे. दोन लस मात्रा पूर्ण न झालेल्या वाहनधारकांना सीमेवरूनच परत पाठवले जात आहे. पण चालत येणाऱ्या भाविकांची संख्या खूप अधिक असल्याने ऑनलाइन दर्शन अव्यवहार कार्यपद्धती ठरू लागली आहे. येणाऱ्या भाविकांना दर्शन व्हायला हवे, अशी सोय महसूल प्रशासनाने केली असली, तरी पोलीस भाविकांना मंदिरात प्रवेश देत नाहीत. भाविकांच्या या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ  दिवेगावकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘घटस्थापनेदिवशी असा प्रकार घडल्याचे समजल्यानंतर त्यातून मार्ग निघेल असे आदेश काढण्यात आले आहेत. १५ हजारांपेक्षा अधिक भाविक आले तरी चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून ऑफलाइन पास देणेही आता सुरू केले आहे. चालत येणाऱ्या आणि मंदिर परिसरात येणाऱ्यांना दर्शन  मिळेल अशी तजवीज केली आहे.’

सर्वसामान्य व्यक्तींना कोविडकाळातील नियमांचे अवडंबर करीत दर्शनाशिवाय परत पाठिवले जात असतानाच भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्म आघाडीचे तुषार भोसले यांना घटस्थापनेच्या दिवशी पोलिसांनी कोणत्याही पासशिवाय मंदिरात प्रवेश दिला. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात होते. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश  दिले. शुक्रवारी तुषार भोसलेंवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्याही परिस्थितीमध्ये चेंगराचेंगरी होणार नाही. भाविकांची खूप गर्दी होते. पण ती गर्दी हाताळण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे. घटस्थापनेदिवशी काही जण दर्शनाशिवाय परत गेले होते. पण कोविडचे नियम पाळून जास्तीतजास्त जणांना दर्शन  मिळाले तर भाविक आपल्या वाटेने परत जातील. त्यांचा तुळजापुरात मुक्काम वाढणे अधिक धोक्याचे असू शकते. त्यामुळे दर्शन लवकर होईल आणि चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी घेत आहोत. – कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद</strong>