छत्रपती संभाजीनगर : महापुरामुळे शेतकऱ्यांची शेती आणि पिके खरवडून गेली आहेत. घरांमध्ये पाणी शिरून काहीच राहिले नाही, जनावरे वाहून गेली. त्यामुळे शेतकरी जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर आहे. राज्य सरकारने आता सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी ५० हजारांची मदत करावी. अन्यथा शेतकऱ्यांबरोबर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. पाऊस थांबल्याने मराठवाड्यातील गोदाकाठचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली असली, तरी अनेक भागांत शेतशिवारात पाणी कायम आहे. दरम्यान, अतिवृष्टी भागात दौरा करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरसकट कर्जमाफीसाठी गुरुवारी आवाज उंचावला.

केवळ पिके नाही, तर घर, जनावरे आणि शेतीची नुकसान भरपाईही द्यावी, अशी मागणी करत उद्धव ठाकरे पूरग्रस्तांशी संवाद साधताना म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे सरकार असताना केलेल्या कर्जमाफीची आपण कधीही जाहिरातबाजी केली नाही. आता शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई होऊ शकत नाही. महापुरामुळे शेती, पिकांचे नुकसान झाले. जनावरे वाहून गेली, घरात पाणी शिरून काहीही शिल्लक राहिले नाही. अशा स्थितीतून पूर्णतः खचून गेलेल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्याचा दौरा करावा. त्यांनी ही विदारक स्थिती पाहून केंद्राकडून भरीव मदत देणे गरजेचे आहे.’

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकूर येथे ठाकरे यांनी भेट दिली. शेती, पीक, घरांच्या नुकसानीची गुरुवारी पाहणी केली. त्याचबरोबर नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी, आमदार कैलास पाटील उपस्थित होते. वेळप्रसंगी कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजाराच्या मागणीसह अन्य प्रकारच्या भरपाईसाठी आपण शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशा शब्दांत ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, की निवडणुकीत सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीचे वचन दिले होते. परंतु ते आता योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे सांगत आहेत. पुरामुळे आता शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, ते कर्जमाफीसाठी पुरेसे नाही का, असा सवाल करत हीच वेळ आहे कर्जमाफीची, असे ठाकरे म्हणाले. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या भाषणात सरसकट कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

कुंभमेळा आणि शक्तिपीठाचा निधी वळवा

शक्तिपीठ आणि कुंभमेळ्यासाठी ठेवण्यात आलेला निधी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडे वळवावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. अनेकांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. अनेक घरांमध्ये आजही पाणी आहे. शेतकरी हैराण आहे. त्यामुळे निधी वळवून बाधितांना दिलासा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असताना मदतीच्या संदर्भात पैशाचे सोंग आणता येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य असंवेदनशील आहे, असे मतही प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी जालना येथे व्यक्त केले.