छत्रपती संभाजीनगर : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वाल्मीक कराडने आता मोक्का कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. याप्रकरणी खंडपीठाचे न्या. संदीपकुमार सी. मोरे आणि न्या. मेहरोझ के. पठाण यांनी गुरुवारी शासनास नोटीस बजावण्याचा आदेश दिला. या अर्जावर १९ सप्टेंबर २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
यापूर्वी वाल्मीक कराडचा या प्रकरणातील अर्ज बीडच्या विशेष न्यायालयाने नामंजूर केला होता. या आदेशाविरुद्ध वाल्मीक बाबूराव कराड याने फौजदारी अर्ज खंडपीठात दाखल केला आहे. या अनुषंगाने मोक्कातील गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल करण्याची मुभा खंडपीठाने अपीलार्थी कराड यास दिली आहे.
सुनील शिंदे याला फोनवरून धमकी दिल्याबद्दल व त्यानंतर संतोष देशमुख याने खंडणीस विरोध केल्याच्या कंपनी परिसरातील घटनेवरून ६ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातून नाव वगळण्याबाबतचा कराडचा अर्ज विशेष न्यायालयाने २२ जुलै २०२५ ला नामंजूर केला होता. अपीलार्थीचे प्रथम माहिती अहवालात नाव नाही, आदी मुद्द्यांवर कराडने ॲड. संकेत एस. कुलकर्णी आणि ॲड. सत्यव्रत जोशी यांच्यामार्फत खंडपीठात वरीलप्रमाणे अर्ज दाखल केला आहे.
पवन ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या अवादा कंपनीला वाल्मीकच्या टोळीने दोन कोटींची खंडणी मागितली होती. या कंपनीचे एक कार्यालय मस्साजोग येथे असून, तेथे जाऊन टोळीने सुरक्षा रक्षकालाही मारहाण केली होती. यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले होते. परंतु संतोष देशमुख हे खंडणीत आड येत असल्याच्या समजातून ६ डिसेंबर रोजी त्यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येमागचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड असल्याचे दोषारोप पत्रात नमूद असून, त्याच्यावर संघटित गुन्हेगारी कलमांन्वये मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.