BMW Motorrad India ने भारतीय बाजारपेठेमध्ये आपली नवीन बाईक लॉन्च केली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी बाइक्सचे नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. या कंपनीने R 18 Transcontinental क्रूझर बाईक लॉन्च केली आहे. R 18 ट्रान्सकॉन्टिनेंटल बाईक संपूर्णपणे CBU मार्गाने भारतात आणली जाणार आहे. या बाईकच्या फीचर्स, किंमत आणि इंजिनची क्षमता याबद्दल जाणून घेऊयात.
कसे आहे या बाईकचे डिझाईन ?
R 18 ट्रान्सकॉन्टिनेंटल बाईकच्या डिझाईनबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये वापरकर्त्यांना पिलियन सीट, स्टोरेज केस , विंडशिल्ड, एलईडी हेडलॅम्प्स, ग्राफिकल एलईडी डीआरएल, विंड डिफ्लेक्टरसह लाईट अॅलॉय कास्ट व्हीलसह मोठा हँडलबार माउंटेड फेअरिंग मिळतो. हे मॉडेल विशेषतः आरामदायी प्रवासासाठी तयार करण्यात आले आहे. तसेच यामध्ये तुम्हाला १०.२५ इंचाचा TFT कलर डिस्प्ले यात देण्यात आला आहे.
इंजिन
या बाईकमध्ये तुम्हाला १८०२ सीसीचे लिक्विड आणि ऑइल कूल्ड , फ्लॅट-ट्विन सिलेंडर बॉक्सर असलेले इंजिन मिळणार आहे. हे इंजिन ४,७५० आरपीएमवर ९१ एचपी पॉवर आणि ३,००० आरपीएमवर १५८ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड कॉन्स्टंट-मेश गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ज्यामध्ये रिव्हर्स गियरचा पर्यायही उपलब्ध आहे. यामध्ये वापरकर्त्यांना रेन, रोल आणि रॉक असे तीन रायडिंग मोडही देण्यात आले आहेत.
R 18 ट्रान्सकॉन्टिनेंटल बाइकमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स बघायला मिळणार आहेत. यामध्ये हीटेड ग्रिप, हीटेड सीट्स, अॅडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लीव्हर्स, इन्फोटेनमेंट सिस्टीम, इंजिन प्रोटेक्शन बार, अडॅप्टिव्ह हेडलाइट्स आणि अँटीथेफ्ट अलार्म सिस्टीम या फीचर्सचा समावेश आहे. या बाईकचे वजन ४२७ किलोग्रॅम इतके आहे. ४ लिटरची रिझर्व्ह टाकी असून २४ लिटर इतकी इंधन क्षमता या बाइकमध्ये देण्यात आली आहे. याचा टॉप स्पीड हा १८० किमी प्रतितास इतका आहे. ही बाईक तुम्हाला ५ रंगांमध्ये खरेदी करता येऊ शकते.
काय असणार किंमत ?
BMW Motorrad India ने R 18 Transcontinental क्रूझर बाईक लॉन्च केली आहे. R 18 ट्रान्सकॉन्टिनेंटल बाईक संपूर्णपणे CBU मार्गाने भारतात आणली जाणार आहे. या बाईकचा सामना हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट ग्लाइड स्पेशल बाइकशी होणार आहे. R 18 Transcontinental या बाईकची (एक्स-शोरूम) ३१.५ लाख इतकी ठेवण्यात आली आहे.